घरमुंबई'मुंबई पालिकेला कोट्यवधींचा चुना लावून लाकूडतोड-पुरवठादार कोट्यधीश!'

‘मुंबई पालिकेला कोट्यवधींचा चुना लावून लाकूडतोड-पुरवठादार कोट्यधीश!’

Subscribe

‘मुंबईत धोकादायक झाडे, फांद्या यांबाबत तक्रार पालिकेकडे आल्यास पालिका नियुक्त लाकूडतोड कंत्राटदार हे ती झाडे, फांद्या तोडतात. नंतर तीच तोडलेली लाकडे गोळा करून मुंबईतील स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला पुरवली जातात. त्या बदल्यात त्या लाकूडतोड कंत्राटदाराला चांगले पैसे मिळतात. तर लाकूड पुरवठादार हे कमी पैशात तीच लाकडे स्मशानात पुरवतात. मात्र पालिकेकडून ३७ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उकळतात’, असा खळबळजनक आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मुंबईतील पालिकेच्या ४६ आणि खासगी ८ अशा ५४ स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेतर्फे ३०० किलोपर्यंत लाकडे मोफत पुरवण्यात येतात. त्यावरील लाकडाचा खर्च संबंधितांना द्यावा लागतो.

या ५४ स्मशानभूमीत लाकडांचा पुरवठा पुढील २ वर्षे करण्यासाठी काही कंत्राटदारांना कंत्राटकाम देण्याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यासाठी पालिका कंत्राटदारांना १०० किलो लाकडे ८२५ रुपये दराने असे तब्बल ३५ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये मोजणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला आहे.

- Advertisement -

मात्र या प्रस्तावावर बोलताना भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, मुंबईत कोणी धोकादायक झाडे, फांद्या यांबाबत तक्रार केल्यास पालिका नियुक्त लाकूडतोड कंत्राटदार त्या झाडांची, फांद्यांची कत्तल करून ती लाकडे गोळा करून नेतात. मात्र, ही लाकडे नेमकी जातात कुठे? त्याचा हिशोब, रेकॉर्ड कोण ठेवतो? कसा काय ठेवतो? असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. तसेच, तो लाकूडतोड करणारा कंत्राटदारच पुढे ती लाकडे स्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा पुरवठा करणाऱ्याला स्वस्त दरात विकतो. त्यामुळे लाकूडतोड करणाऱ्या कंत्राटदाराला दुहेरी आर्थिक लाभ होतो. त्याचप्रमाणे स्मशानात लाकडांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारालाही कमी पैशात आयती लाकडे मिळतात आणि दुसरीकडे पालिकेकडून कोट्यवधी रुपये मोबदला मिळतो. त्यामुळे हे कंत्राटदार पालिकेला चुना लावून कोट्यधीश होतात. मात्र यात पालिकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होते, असे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

यावेळी, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी, नागपूर पालिकेकडून स्मशानभूमीत तांदळाच्या तुसापासून तयार केलेल्या विटांचा वापर केला जातो. प्रदूषण होत नसतानाच आर्थिक बचत होत असल्याने पालिकेने त्याचे अनुकरण करावे, असे सुचवले. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी धूरविरहित, पर्यावरणपूरक पर्याय तपासण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -