घरमुंबईलोकसभेचा अ‍ॅप मार्केट

लोकसभेचा अ‍ॅप मार्केट

Subscribe

निवडणुकांमधील यश हे केवळ प्रचार आणि पैसा यांच्या जोरावर मर्यादित राहिलेले नाही. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही कमी वेळात किती जास्त मतदारांपर्यंत पोहोचता यांसारख्या ट्रिक्सदेखील जमणे अनिवार्य बनले आहे. म्हणूनच देशातील बलाढ्य पक्ष अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक प्रचाराऐवजी जास्त भर तंत्रज्ञानाला देत आहेत. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगानेही पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरकर्त्यांचा मोठा टेक कनेक्ट पाहूनच इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. लोकसभा २०१९च्या निवडणुकीच्या निमित्ताने गुगल प्ले स्टोअरवरचा अ‍ॅप बाजारही तितकाच हॉट झाला आहे. मतदारांच्या आणि मतदानाशी संबंधित लोकोपयोगी माहिती, वोटर लिस्टपासून ते पोलिंग स्टेशन आणि एक्झिट पोल यांसारख्या भरगच्च अ‍ॅप्लिकेशनचा प्ले स्टोअरवर भरणा सुरू झालेला आहे. लोकसभेचे मोठे मार्केट टॅप करण्यासाठी म्हणूनच प्ले स्टोअरदेखील तितकेच सज्ज झाले आहे.

व्हील चेअर रिक्वेस्ट
दिव्यांग मतदारांचा लोकशाहीप्रक्रियेत सहभाग वाढावा या उद्देशाने दिव्यांगांसाठी सुलभ निवडणुका हे घोषवाक्य भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच अशासकीय संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा दिव्यांग मतदारांना PwD या अ‍ॅपचा वापर करून मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हील चेअरची मागणी करण्याचा पर्याय दिला आहे. लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतदार यादीत २ लाख २४ हजार १६२ अपंग मतदार समाविष्ट आहेत. दिव्यांग मतदारांची नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे आदी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने PwD हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये बूथ लोकेट करण्याचाही पर्याय आहे. तसेच निवडणूक ओळखपत्र घरपोच मिळवण्याचाही पर्याय अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येईल.

- Advertisement -

दिसला बॅनर, फोटो टाका अ‍ॅपवर
मतदारसंघात लोकप्रिय कामांच्या घोषणेबाबतचा एखादा बॅनर, होर्डिंग किंवा एखादी आचारसंहिता यांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार रिअर टाईम लोकेशनसह करणे शक्य आहे. संबंधित ठिकाणासह फोटो आणि व्हिडिओच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला लोकशाही प्रक्रियेतील योगदान म्हणून या अ‍ॅपचा प्रभावी वापर करणे शक्य आहे. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होताना दिसल्यास त्या प्रसंगाचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून दक्ष मतदाराला तक्रार नोंदवता येणार आहे.

ईव्हीएम परीक्षापूर्व अभ्यास
आजचा स्मार्टफोन वापरकर्ता आपल्या जबाबदार्‍यांच्या बाबतीतही तितकाच स्मार्ट आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचून उमेदवार निवडण्याचे पारंपरिक मतदान प्रक्रियेचे दिवस आता गेले. प्रत्येक उमेदवाराचा बायोडेटा आणि कामांचा आढावा घेऊनच हे स्मार्ट मतदार ईव्हीएम मशीनवर निवडणुकांसाठी उभ्या मतदारांचे भवितव्य बटन दाबून निश्चित करतात. असेच मतदानाच्या पूर्वीचे अभ्यासाचे पर्याय लोकतंत्रने उपलब्ध करून दिले आहेत. लोकतंत्र अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. आपल्या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघानुसार मतदाराचे नाव नेमके कोणत्या मतदार यादीत समाविष्ट आहे, याबाबतची माहिती मिळू शकेल. तुमच्या नावानुसार कुठे आणि कधी मतदान करायचे याबाबतची माहिती मिळू शकेल. उमेदवाराची माहिती, व्हिडिओ, लेख आदी माहिती मिळेल.

- Advertisement -

प्राईम मिनिस्टर पोलिंग
लाईव्ह पोलच्या माध्यमातून लोकसभा २०१९ निवडणुकीनंतरचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यासाठीचा पोल अ‍ॅपच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. लोकसभा इलेक्शन २०१९ या नावाने अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांसारख्या उमेदवारांचा पर्याय देणारा हा पोल आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून भारतातील आतापर्यंतचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्य निवडणूक आयुक्त, सध्याचे देशातील राज्यांचे मुख्यमंत्री, देशाचे मुख्य न्यायाधीश यांसारखा सगळा डेटा अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

ओपिनिअन पोल २०१९
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध विषयांवर स्मार्टफोन युजर्सना अ‍ॅपच्या माध्यमातून चर्चेत सहभाग करून घेण्यासाठी तसेच ओपिनिअन पोलसाठी या अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या बातम्यांचा आढावा तसेच माहितीचा आढावा या अ‍ॅपमधून घेण्यात येणार आहे.

वोटर हेल्पलाईन
राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग अधिकाधिक वाढावा म्हणून वोटर हेल्पलाईन हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव शोधणे, नवमतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे यांसारख्या सुविधांचाही अ‍ॅप्लिकेशनमध्ये समावेश आहे. मतदान प्रक्रियेबाबत तक्रार करणे तसेच तक्रारीचा आढावा घेणेही अ‍ॅपच्या माध्यमातून शक्य आहे. ईव्हीएम मशीनबाबत, मतदार, निवडणूक प्रकियेशी संबंधित हमखास विचारण्यात येणार्‍या प्रश्नांचाही यामध्ये समावेश आहे.

चाणक्य
निवडणुकीचे निकाल आणि राजकीय विश्लेषण यानिमित्ताने हे अ‍ॅप्लिकेशन मतदारांनाही उपयुक्त ठरणार आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये याआधीचा मतदानाचा पॅटर्न या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणे शक्य आहे. बूथ पातळीवरील मतदानाची आकडेवारी मिळण्यासाठीचे हे एक महत्त्वाचे अ‍ॅप्लिकेशन आहे. ओपिनिअन पोल, जातनिहाय समीकरणे, मतदानातील बदलत्या पॅटर्नमधील पॅटर्न तसेच विधानसभानिहाय मतदानाचा आढावाही येत्या दिवसांमध्ये अ‍ॅपमध्ये समाविष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 02/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 09/04/2019 (मंगळवार)

* नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 10/04/2019 (बुधवार)

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12/04/2019 (शुक्रवार)

* मतदानाचा दिनांक 29/04/2019 (सोमवार)

* मतमोजणी दिनांक 23/05/2019 (गुरुवार)

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/05/2019 (सोमवार)

लोकसभा निवडणूक २०१९

राज्यातील मतदार – ८ कोटी ७३ लाख
महाराष्ट्रातील नवमतदार – 1 कोटी 19 लाख 95 हजार 27
ऑनलाईन नोंदणी करणारे मतदार – 7 लाख 17 हजार 427

 

देशातील राज्ये – २९
केंद्रशासीत प्रदेश – ७
एकूण मतदार – 89 कोटी 87 लाख 68 हजार 978
पुरुष मतदार – 46 कोटी 70 लाख 4 हजार 861
महिला मतदार – 43 कोटी 16 लाख 89 हजार 725
तृतीय पंथी मतदार – 31 हजार 292
देशातील नवमतदार – 15 कोटी 6 लाख 4 हजार 824

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -