राज ठाकरेंच्या प्रश्नांना मोदींची बगल

pm naredra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अडचणीच्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचा पुरती तयारी भाजपच्या नेत्यांनी केल्याचे दिसते. राज्याच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर यासाठी पध्दतशीर मार्ग अवलंबलेला दिसतो आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा चौकीदारामुळे नोटांची बंडले सापडत असल्याचे ते सांगत आहेत. विशेषत: राज ठाकरे यांनी राज्यात भाजपविरोधात एकच राळ निर्माण केली असताना त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देताना दिसत नाहीत.

राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणांमध्ये नोटबंदीच्या वेळी झालेला घोटाळा आणि त्याआधी अनेक शहरांत खरेदी केलेल्या जमिनी, मुद्रा योजनेतील पैशांचा घोटाळा, काश्मीरमध्ये सैन्यावर कारवाई करण्यासाठी दिलेले आदेश आणि डिजिटल इंडियाच्या दाखवलेल्या स्वप्नांचे काय झाले, असे अनेक प्रश्न विचारले होते. राज यांच्या या प्रश्नांची राज्याच्या दौर्‍यावर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरे देतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, मोदींनी यातल्या एकाही प्रश्नाला हात घातला नाही. लातूर जिल्ह्यातील औसा येथे मोदींची मंगळवारी सभा झाली. पण एकही मुद्दा त्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात घेतला नाही.

मागील आठवड्यात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली होती. त्याआधी मनसेच्या स्थापना दिनीही ९ मार्च या दिवशी रंगशारदा येथे आयोजित मेळाव्यात मोदी सरकार जनतेला फसवले,असे आरोप करत राज यांनी याचे पुरावे देखील दिले होते. त्यानंतर मोदी महाराष्ट्र दौर्‍यावर आल्यानंतर उत्तर देतील असे वाटले होते. मात्र, राज ठाकरे यांचे दावे आणि उपस्थित केलेले प्रश्न टाळले. लातूर येथील सभेत मोदींनी काँग्रेसवर कडाडून टीका करताना भाजपच्या जाहिरनाम्याविषयी माहिती दिली. यावेळी मोदींनी शरद पवार यांना पुन्हा लक्ष केले.

मोदींकडून शहिदांच्या नावे मतांची मागणी

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदाच मतदान करणार्‍या नवमतदारांना बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणार्‍या जवानांना आणि पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांना आपले मत समर्पित करण्याची भावनिक साद घातली. २१ व्या शतकात देशाचे सरकार निवडणारे हे मतदार आहेत. त्यामुळे आपले पहिले मत देशासाठी द्या. देश कणखर करण्यासाठी द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

देशातील नवमतदारांना आपल्या जीवनातील पहिले मत लक्षात राहू शकते. आपले पहिले मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणार्‍या जवानांना समर्पित केले पाहिजे, असे आवाहन केले. त्यानंतर मोदींनी शहिदांच्या नावे मतांचे राजकारण केल्याची चर्चा सुरू झाली आहे.