घरताज्या घडामोडीभोंग्यांचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

भोंग्यांचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात

Subscribe

हिंदू महासभेने केली सुमोटो दखल घेण्याची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. मनसे पाठोपाठ हिंदू महासभेने देखील हा प्रश्न उचलून धरला आहे. भोंग्यांवरून देण्यात येणार्‍या अजानवर पूर्णपणे बंदी घालावी, याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांना पाठवले आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात अनेक तर्क मांडण्यात आले आहेत. मशीद, ईदगाह आणि दर्गा ही प्रार्थनास्थळे नाहीत तर सार्वजनिक संमेलन आणि बैठकांची ठिकाणे आहेत. त्यामुळेच ही स्थळं सामुदायिक बैठकीची ठिकाणे म्हणून घोषित केली जावीत, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.

- Advertisement -

हिंदू महासभेच्या म्हणण्यानुसार, ज्या वेळी इस्लामचा उदय झाला, धर्माचा प्रसार होवू लागला. कुराण समाजात आले, त्यावेळी भोंगे अस्तित्वात नव्हते. कुठेही धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी भोंग्यांचा वापर होत नव्हता. इस्लाम आणि भोंग्यांचा काहीही परस्परसंबंध नाही. त्यामुळे भोंग्यावरून होत असलेल्या अजानवर बंदी घालण्यात यावी. सर्वच धार्मिक स्थळांवर सण वगळता इतर दिवशी भोंग्यांना मनाई असावी, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून सुमोटो दखल घ्यावी, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

राज ठाकरे यांनी येत्या 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिले आहे. हे भोंगे न हटवल्यास दुप्पट आवाजात मशिदींसमोर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालिसा वाजवण्याचे निर्देश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्याशिवाय 3 मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी स्थानिक मंदिरांमध्ये महाआरत्या करण्याच्या सूचनाही राज यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

मुस्लीम रस्त्यावर आले तर…
दरम्यान मौलाना तौकीर रझा यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तौकीर रझा म्हणाले की, देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. ज्या दिवशी देशातील मुस्लीम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल. दिल्लीतून जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. पुढील 10 दिवसांनी बैठक होणार असून त्यानंतर जेल भरो आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -