अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाला रोखणार एम-बीपाल औषधोपचार पद्धती

भारतात ९ ठिकाणी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब

M-Bipal medication methods for tuberculosis

मुंबईतील अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाने पीडित रुग्णांना आता मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील जुन्या शताब्दी (पंडित मदन मोहन मालवीय) रुग्णालयात एम-बीपाल औषधोपचार पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यामध्ये, बेडाक्विलीन, प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड या तीन औषधांच्या मिश्रणाने उपचार केले जाणार आहेत. सदर औषधोपचार पद्धतीचे भारतातील मुख्य अन्वेषक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विकास ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली सदर उपचार सुरु करण्यात आले आहेत. शताब्दी रुग्णालयातील एका रुग्णास सदर मिश्र औषध पद्धती आजपासून सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात या नवीन औषधोपचार पद्धतीचा लाभ घेणारा हा पहिलाच रुग्ण ठरला आहे.

वास्तविक, संपूर्ण भारतात ९ ठिकाणी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब ‘अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोग’ पिडीत रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका या देशात निक्स ट्रायल या नावाने ही पद्धती सुमारे ९१ टक्के यशस्वी झाली आहे.

जगभरात अनेक रोग, आजार आहेत. मात्र औषधांनाही दाद न देणाऱया क्षयरोगांवरील उपचारपद्धती शोधणे आणि ती यशस्वी करुन क्षयरुग्णांना दिलासा देणे, हे कालपर्यंत तरी जगातील वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान होते.
या आव्हानाला सामोरे जावू शकणारी व अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांसाठी आशेचा किरण ठरु शकेल, अशी नवीन औषधोपचार पद्धती संशोधकांच्या अथक प्रयत्नांमुळे उपलब्ध झाली आहे. एमबीपाल (M-BPal Trial) या नावाने सदर औषधोपचार पद्धतीचा अवलंब मुंबईतील पालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात सुरु करण्यात आला आहे.

कोविड-१९ विषाणू संसर्ग साथरोगाचा विदारक अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे. तथापि, क्षयरोगाचा विचार करता, औषधांनाही दाद न देणारा क्षयरोग हा दर दोन मिनिटात तीन क्षयरोग्यांचा बळी घेतो, ही वस्तुस्थिती लक्षात घेता, औषध प्रतिरोधी म्हणजेच औषधांनाही न जुमानणारा क्षयरोग (Drug Resistant TB) हा अधिक घातक आहे, याची कल्पना येते. अशा स्थितीत क्षयरुग्णांना दिलासा देवू शकणारी, त्यांना आशेचा किरण दाखवणारी नवीन औषधोपचार पद्धती उपलब्ध झाली आहे.

अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांना बेडाक्विलीन, प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड या तीन औषधांची प्रत्येकी एक गोळी एका दिवशी दिली जाते. यापूर्वीच्या उपचार पद्धतीमध्ये निरनिराळ्या ४ ते ५ औषधे मिळून दिवसभरात सुमारे १० ते १२ गोळ्या रुग्णांना देण्यात येत होत्या. ही बाब लक्षात घेता, सदर नवीन औषधोपचार संबंधित क्षयरुग्णांसाठी अधिक सुसह्य ठरतील, अशी वैद्यकीय तज्ज्ञांना अपेक्षा आहे.


हेही वाचा – ‘त्या’ कर्मचाऱ्यांची आता प्रमोशनसाठीच्या परीक्षेतून सुटका