घरमुंबईवाचा काय असेल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये...

वाचा काय असेल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये…

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि मराठी माणसाच्या हृदयात असलेले हे नाव ! बाळासाहेबांनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आजही आणि पुढेही मराठी माणसांच्या मनात कायम राहणार आहेत. त्यांच्या आठवणींचे भव्य स्मारक व्हावे, अशी तमाम मराठी माणसांची इच्छा आहे. साहेबांच्या स्मारकाची वाट पाहणार्‍या शिवसैनिकांसाठी आणि तमाम मराठी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम मार्गी लागले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या स्मारकात काय असणार आहे, याची माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे.

दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी अखेर ट्रस्टच्या ताब्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी महापौर बंगल्याच्या भिंतींवर दिसणार असून विशेष म्हणजे 100 वर्षे टिकतील, अशा भिंती उभारल्या जाणार आहेत. आठवणींच्या भिंतीना लेझर शोची झळाळी दिली जाणार असून परिसरात औषधी वनस्पतीही लावल्या जाणार आहेत. याचबरोबर बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्रे, आठवणी तसेच त्यांची छायाचित्रे असा मोठा खजिना स्मारकाच्या रुपात तमाम मराठी बांधवांसाठी खुला होणार आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्या महापौर बंगल्यात बांधणार आहेत, त्या महापौर बंगल्याला कुठलाही धक्का लावला जाणार नाही. विशेष म्हणजे या स्मारकामुळे महापौर बंगल्याच्या भिंतीदेखील उजळून निघणार आहेत. या बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर बाळासाहेबांच्या आठवणी पाहता येणार आहेत. महापौरांच्या बंगल्यातील ११ हजार ५५० चौरस मीटर जागेत स्मारक उभारले जाणार आहे. हा बंगला २३०० चौरस फूट जागेत बनलेला आहे. मात्र, स्मारक बांधण्यासाठी ९००० चौरस फुटांचा परिसर वापरला जाणार आहे. या बंगल्याचे तळघर स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे. तळघरात स्मारक बनवले तर, बंगल्याच्या परिसरातील लॉन्ससुद्धा अबाधित राहतील, असे बाळासाहेब स्मारक ट्रस्टने स्पष्ट केले आहे. तसेच बंगला परिसरातील नोकर आणि वाहन चालकांची घरे पाडण्यात येतील. तेथे पर्यटकांसाठी इतर सोयी सुविधा करण्यात येणार आहेत. तसेच दक्षिण-पूर्वेला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येणार आहे.

ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या सभांना गर्दी व्हायची त्याच शिवाजी पार्क शेजारी लागून असलेल्या महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असून, ही जागा बाळासाहेब स्मारक ट्रस्टला मिळायला अडचणी येत होत्या. मात्र आता स्मारकासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. ही जागा मंगळवारी ट्रस्टच्या ताब्यात आली असून आता लवकरच स्मारकाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

हे स्मारक बांधताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणार्‍या प्रत्येक बाबींची काळजी घेतली जाणार आहे. बाळासाहेब हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यामुळे त्यांनी काढलेली व्यंगचित्रे, त्यांची घणाघाती भाषणे, महाराष्ट्र दौर्‍यातील फोटो या सगळ्यांचा संग्रह एकत्र पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर बाळासाहेबांच्या आठवणी दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी आता महापौर बंगल्याच्या भिंतीचे बांधकाम किती वर्षे टिकू शकते आणि अजून 100 वर्षे टिकण्यासाठी काय करावे लागेल यावरदेखील सध्या काम सुरू आहे.

महापौर बंगल्याच्या भिंतीवर लेझर शोचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापरदेखील करण्यात येणार येईल. स्मारकाचा आराखडा आर्किटेक्ट आभा नरेन लांबा यांनी बनवला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यावर काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचे डिझाइन आवडले आहे. 3 ते 4 कंपन्या बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामासाठी तयार झाल्या आहेत. लवकरच यातील एका कंपनीला काम देऊन सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. बाळासाहेबांचे श्वानप्रेम जसे सर्वश्रुत होते, तशी त्यांना झाडेदेखील आवडायची. त्यामुळेच त्यांना आवडणारी औषधी वनस्पतींची काही झाडे स्मारक परिसरात लावण्यात येणार आहेत. पर्यटकांना आणि बाळासाहेबांना मानणार्‍या प्रत्येकाला या स्मारकाच्या माध्यमातून त्यांची आठवण सोबत घेऊन जाता येणार आहे.

उद्धव ठाकरे देणार माहिती

बाळासाहेब हे नामवंत व्यंगचित्रकार होते. त्यांची जशी भाषणे गाजलीत, तितकीच त्यांची अनेक व्यंगचित्रेदेखील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या स्मारकात दर ३ महिन्यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे शिबीर भरवण्यात येणार आहेत. या शिबिरात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात येईल. बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक  आराखड्याची माहिती

100 वर्षे टिकतील अशा भिंतींची उभारणी
आठवणींच्या भिंतींना लेझर शोची झळाळी
स्मारकाची जागा अखेर ट्रस्टच्या ताब्यात
९००० चौरस फुटांवर साकारणार स्मारक
स्मारक परिसरात औषधी वनस्पती लावणार
दर ३ महिन्यांनी व्यंगचित्रकारांचे शिबीर

बाळासाहेबांचे स्मारक युती सरकार उभारणार असून यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक बांधले जाणार आहे.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -