“..तर आम्ही कोर्टात जाऊ”, सुनील प्रभूंचा शिंदे गटाला इशारा; यावर उदय सामंत म्हणाले…

आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात व्हीपवरून गोंधळ उडणार, असं चित्र दिसतंय.

Sunil-Prabhu-Uday-Samant
आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात व्हीपवरून गोंधळ उडणार, असं चित्र दिसतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तांतरानंतरचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीच पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून ऐकू येत असलेला शब्द ‘व्हीप’ यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजतोय.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. यावरून आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “आम्हाला अजुनही कोणताच व्हीप प्राप्त झालेला नाही” असा खुलासाच सुनील प्रभू यांनी केलाय. यापुढे बोलताना त्यांनी शिंदे गटाला इशारा देखील दिलाय. “निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली नाही. तोपर्यंत दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना कोणतीही कारवाई न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही जर शिंदे गटाने व्हिप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ” असं देखील सुनील प्रभू म्हणाले. तर “आम्ही व्हीप मानणार नाही. आम्हाला व्हीप लागु होतं नाही. आम्ही अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसणार” असं वक्तव्य अजय चौधरी यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावर स्पष्टीकरण देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आम्ही अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. त्यांचे आदेशाचं तंतोतंत पालन केलं जात आहे. अधिवेशनाला हजर राहण्याचा आदेश ही कारवाई होत नाही. त्यांनी सगळ्यांनी अधिवेशनाला हजर राहावं यासाठीचा हा व्हीप आहे.” , असं उदय सामंत म्हणाले.

आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात व्हीपवरून गोंधळ उडणार, असं चित्र दिसतंय. मात्र या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे गाजतील? कोणत्या विषयांवर चर्चा होईल? आणि राज्याच्या अर्थसंकल्पात कशावर भर दिला जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.