मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. सर्वच पक्षांच्या राज्यात जाहीर सभा सुरु आहेत. त्यासोबतच टीव्ही आणि वृत्तपत्रांतून जाहिराती प्रसारित होत आहेत. या संपूर्ण प्रचारावर निवडणूक आयोगाचेही लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका जाहिरातीवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी तयार केलेल्या या जाहिरातीमधील आक्षेपार्ह मजकूर काढून घ्यावे असे आदेश आयोगाकडून अजित पवार गटाला देण्यात आले आहेत.
काय आहे जाहिरातीत?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त अजित पवार गटाने ‘घड्याळाचे बटन दाबणार आणि सर्वांना सांगणार’ अशा आशयाची एक जाहीरात तयार केली आहे. या जाहिरातीमध्ये पती-पत्नीमधील संवाद आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जाहिरातीमधील संवाद नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप घेतला आहे. आक्षेपार्ह भाग काढून जाहिरात प्रसिद्ध करावे असे निर्देश देण्यात आले आहे.
अजित पवार गटाच्या जाहिरातीत पत्नी पतीला धमकी देत असल्याचा संवाद आहे. एका विशिष्ट पक्षाला मतदान केले नाही तर तुला जेवण देणार नाही अशा आशयाचा तो संवाद आहे. त्याला आयोगाने आक्षेप घेतला आहे. कोणालाही एका विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यास जेवण, अन्न नाकारले जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
जाहिरातीत आक्षेपार्ह काय?
अजित पवार गटाच्या जाहिरातीमधील स्त्री पात्र (पत्नी) आपल्या पतीला महायुती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या योजनांची माहिती देते. त्यानंतर “आता तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, नाहीतर आज रात्री मी तुम्हाला जेवायला देणार नाही”, असं म्हणते. तर निवडणूक आयोगानं याच दृष्यावर आणि संवादावर आक्षेप घेतला. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळं कोणीही कोणाला अन्न-जेवण नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.
हेही वाचा : Priyanka Gandhi : सरकार पाडण्यासाठीच्या बैठकीत उद्योगपती अदानींचे काय काम, प्रियंका गांधीचा रोकडा सवाल
सर्वोच्च न्यायालयानेही अजित पवार गटाला सुनावले
याआधी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तंबी दिली आहे. घड्याळ चिन्ह हे न्याय प्रविष्ठ आहे, तसे प्रत्येक जाहिरातीत घड्याळ चिन्हाखाली लिहिले पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच परवा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचे फोटो वापरण्यावरुनही अजित पवार गटाची खरडपट्टी काढली. ‘तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे’, असे सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावले. यावरुन विरोधीपक्षकडूनही अजित पवार गटावर टीका होत आहे.
Edited by – Unmesh Khandale