लव्ह जिहादचा मुद्दा सभागृहासह बाहेरही तापला, नितेश राणे-अबू आझमी आमने-सामने

हा मुद्दा इतका गाजलाय की नितेश राणे आणि अबु आझमी थेट विधीमंडळाच्या आवारात आमने-सामने आले आहेत.

Nitesh Rane-Abu Azmi

राज्याच्या अधिवेशनामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या. यावेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण मुद्द्यावरही जोरदार चर्चा झाली. यावेळी याविषयावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. हा मुद्दा इतका गाजलाय की नितेश राणे आणि अबु आझमी थेट विधीमंडळाच्या आवारात आमने-सामने आले आहेत.

या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे आणि सपाचे आमदार अबू आझमी यांच्यात बाचाबाची होता होता राहिली. विधानभनबाहेर नितेश राणे प्रसारमाध्यमांसोर बोलत होते. यावेळी यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारला जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारला जात आहे, अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं. त्यावर अबू आझमी यांनीही हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे असं म्हटलं.

त्यानंतर नितेश राणे लव्ह जिहाद मुद्द्यावर बोलू लागले. तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान आहे असं नितेश राणे म्हणाले. तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असं नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला ५० ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.

यावर नितेश राणे चांगलेच संतापलेले दिसून आले. अबू आझमींना उत्तर देत आणखी पुढे नितेश राणे म्हणाले की, “यांना सत्य स्विकारायचं नाही आहे. यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. पण सत्य ऐकण्याची ताकद यांच्यात नाही. काही मोजक्या लोकांना हाताशी धरुन त्यांना मोठं केलं जात आहे. यांच्या अशा वागण्यांमुळे त्यांना मदत होते यांना ही साधी गोष्ट कळत नाही. यांच्यामुळे जर त्या मुलींचं आयुष्य बर्बाद होत असेल तर ते योग्य नाही,” तसंच “मी खरं बोलतोय हे त्यांना पटलं नाही. आपण आज किंवा उद्या उघडे पडणार याची त्यांना कल्पना आहे, म्हणून ते जवळ आले होते. पण यांच्यामुळे आमच्या काही हिंदू मुलींचं आयुष्य बर्बाद होणार तेव्हा हे येणार का? काही मुलींना सौदीत विकलं जातं, तेव्हा हे मदतीला येणार का? येथे बोलण सोपं आहे. त्या मुलींचे अश्रू पुसायला गेले तर यांना सत्य कळेल,” असं नितेश राणेंनी सांगितलं.

तसंच “कोणी कोणाशी लग्न करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण लग्नाच्या आधी तो आशिष असतो, पण लग्नानंतर अमिन होतो हीच तर समस्या आहे. तू त्या मुलीला लग्नानंतरही हिंदू ठेव ना. तिने कुराण वाचावं, हिंदू देवतांचे फोटो काढावेत ही जबरदस्ती का? यावरच आमचा आक्षेप आहे”, असं देखील नितेश राणे म्हणाले.