घरमुंबईदक्षिण मुंबई संमिश्र,पश्चिम पूर्व उपनगरात शुकशुकाट

दक्षिण मुंबई संमिश्र,पश्चिम पूर्व उपनगरात शुकशुकाट

Subscribe

दक्षिण मुंबई,पश्चिम,पूर्व उपनगरात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून बुधवारी मुंबईत पुकारण्यात आलेल्या बंदचे प्रतिसाद उमटले.

दक्षिण मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद

ठाणे आणि भांडूप परिसरात या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. मात्र, दक्षिण मुंबईत दादर, लालबाग वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी दुकाने सुरूच असल्याचे चित्र दिसून आले तर हिंदमाता आणि परळ परिसरातही कडकडीत बंद पाळण्यात आले.

दादर परिसरात मात्र सकाळपासून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले. सकल मराठा समाजातर्फे दादर टीटी परिसरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. बंदमुळे नेहमी वाहतूक कोंडीने गजबजणार्‍या दादर परिसरात दिवसभर शांतता पसरली होती. त्यानंतर हिंदमाता आणि परळ परिसरात बंदचे पडसाद दिसून आले. परळ येथे दुपारी १२ च्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर लालबाग परिसरातही बंदचे प्रतिसाद उमटताना दिसले. सध्या गणेशोत्सवाच्या तयारीने गजबजलेले लालबाग आणि आसपासच्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने याठिकाणी शांतता पसरली होती.

- Advertisement -

भेंडीबाजार सुरूच

दक्षिण मुंबईत सर्वत्र बंद पुकारला असताना नागपाडा, भेंडी बाजार आणि महम्मद अली परिसरात सर्वत्र सुरळीत होते. याठिकाणी दुकाने आज दिवसभर सुरूच ठेवली. त्यामुळे याठिकाणी बंद पाळण्यात आलेला नसल्याचे चित्र पहायला मिळाले. पण या परिसरात एक वेगळी शांतता मात्र आज कायम होती. तर दुपारी तीननंतर सकल मराठा समाजातर्फे मुंबई बंद मागे घेण्यात आल्यानंतर दक्षिण मुंबईत प्रामुख्याने दादर, परळ, लालबाग आणि काळाचौकी परिसरातील दुकाने सुरू करण्यात आल्याने सर्वत्र सुरळीत सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

- Advertisement -

पश्चिम उपनगरात आंदोलन शांततेत

सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद पश्चिम उपनगगरात शांततेने पार पडल्याचे पहाला मिळाले. एक दोन ठिकाणी रास्ता रोको वगळता इतर ठिकाणी शांततेत आंदोलन झाले.

जोगेश्वरीमध्ये रेल रोको 

सकाळी 9.16 च्या सुमारास जोगेश्वरी येथे काही कार्यकर्त्यानी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र 9 वाजून 24 मिनिटांनी रेल्वे सेवा पूर्व पदावर आली. तर दुपारच्या सुमारास जोगेश्वरी येथील पश्चिम दुतग्रती महामार्गावर तसेच कांदिवली येथे आंदोलन कर्त्यांनी रास्तारोको केला. मात्र पोलिसांनी लगेच परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे गोराई येथे सकाळी पोलिसांनी 5 ते 6 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.

दहिसर चेक नाक्यावर पोलीस बंदोबस्त 

खबरदारीची सूचना म्हणून दहिसर चेक नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला त्यामुळे दहिसर, बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव या ठिकाणी आंदोलनाला कुठेही हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले नाही. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड या भागात आंदोलकानी दुकाने बंद केली.


 

 

घाटकोपर ते मुलुंड रस्त्यावर शुकशुकाट

 

 

 

सकल मराठा समाजाने बुधवारी पुकारलेल्या ‘मुंबई बंद’ला पूर्व उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घाटकोपर, एलबीएस मार्ग, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर व मुलुंड येथील सर्व दुकाने व आस्थापने नागरिकांनी बंद ठेवली होती. टायर जाळण्याच्या, रास्तारोकोच्या काही घटना वगळता आंदोलन शांततेच पार पडले. बेस्ट सेवा सुरळीत सुरू असली तरी रिक्षांचे प्रमाण फारच कमी होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी भांडुप पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिले. तसेच भांडुप ते कांजूरमार्ग अशी भव्य मोटरबाईक रॅलीही आंदोलकांकडून काढण्यात आली. त्यामुळे सर्व परिसरात एक मराठा, लाख मराठाचा आवाज दुमदुमला.

भांडुपप्रमाणे मुलुंडमध्येही आंदोलक रस्त्यावर उतरले. मुलुंड चेकनाक्यावर आंदोलकांनी वाहतूक अडवल्याने मुंबईत येणारी व बाहेर जाणारी वाहतूक ठप्प झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी टायर जाळल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक सुरळित केल्याने वातावरणातील तणाव निवळण्यास मदत झाली.

शिवसेनाही आंदोलनात सहभागी

विक्रोळीतही सकल मराठा समाजाचे आंदोलकही रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर आंदोलन केले. मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या मुद्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याने विक्रोळीतील आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दिसून येत होते. कन्नमवार नगर स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत, शाखाप्रमुख अभय राणे व शंकर ढमाळे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी तसेच शिवकार्य प्रतिष्ठानचे प्रभाकर भोसलेही सहभागी झाले होते.

भाजी नाही; मासळी उपलब्ध

मराठा समाजाच्या आंदोलनामुळे परिसरातील दुकाने व भाजी मार्केट बंद ठेवण्यात आली असताना विक्रोळी व भांडुपमधील मासळी बाजार मात्र सुरू होते. मासळी विक्रेत्यांना आम्ही रात्री सूचना देण्यास विसरल्याने त्यांनी सकाळी मासळी आणली. त्यांनी धंदा बंद ठेवल्यास त्यांचे मोठे नुकसान होईल. यामुळेच मासळी बाजार सुरू ठेवण्याबाबत आम्ही कोणतीही हरकत घेतली नाही, असे भांडुपमधील सकल मराठा समाजाचे समन्वयक बिपीन विचारे यांनी सांगितले.

 

आंदोलनामुळे शाळांना सुट्टी

आंदोलनाला सुरुवात होताच शाळांनी खबरदारी घेत मुलांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच काही शाळांनी पालकांना मुलांना शाळेत आणू नका असा मेसेज दिला. त्यामुळे घाटकोपर ते मुलुंड परिसरातील शाळांमध्ये शुकशुकाट होता. आंदोलन सुरू होताच घाटकोपरमधील शाळांनी मुलांना सकाळी 11 वाजताच घरी सोडले. तर भांडुपम, विक्रोळीमधील शाळांमध्ये दुपारचे सत्रच भरवण्यात आले नाही.

 

रिक्षाचालकांनीच अडवल्या रिक्षा

मराठा रिक्षाचालकांनी रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रिक्षा थांबवून त्यातील प्रवाशांना रिक्षातून उतरवून रिक्षा बंद करण्यास सांगत होते. आंदोलनादरम्यान कोणीही रिक्षावर दगडफेक करू नये व रिक्षाचालकांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही रिक्षाचालकांना रिक्षा बंद करण्याची विनंती करत आहोत. आमचा आंदोलनाला पाठिंबा असून, आंदोलन शांततेत पार पाडावे यासाठीच आम्ही हा निर्णय घेतल्याचे रिक्षाचालक शरद जाधव यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -