वक्फ बोर्डाच्या सदस्याकडून महिलेवर बलात्कार–देवेंद्र फडणवीसांचा दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब

भाजपचे आमदार गिरिश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकीलाच्या मदतीने ठाकरे सरकार षडयंत्र रचत असल्याचा विधानसभेत बॉम्ब टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला. यावेळी फडणवीसांनी वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने एका महिला सामाजिक कार्यकर्तीवर बलात्कार केल्याचा आरोप करत विधानसभा दणाणून सोडली. तसेच हा आरोपी अद्याप मोकाट असून या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमबरोबर संबंध असूनही तो अजूनही वक्फ बोर्डात कसा असा सवाल करत ठाकरे सरकारला कोंडीत पकडले. यावेळी फडणवीस यांनी वक्फशी संबंधित सदस्याच्या व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला.

फडणवीस यांच्या या दुसऱ्या पेनड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली असून पुढे कोणाचे नाव येईल या विचाराने सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या सदस्याच्या व्हिडीओ संभाषणात जी दोन माणसे आहेत त्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यातील एकाचा नाव मोहम्मद अर्शद खान तर दुसऱ्याचे नाव डॉक्टर मुदीस्सर लांबे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच वक्फ बोर्डावर यातील मुदीस्सर लांबेची नेमणूक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२० ला एका सामाजिक कार्यकर्ती महिलेने मुदीस्सर विरोधात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर या महिलेला धमकी देण्यात आली. सदर महिलेला मुदस्सीर याने लग्नाचे आमिष दाखवले. पण तो आपल्याशी लग्न करणार नसून आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने त्याच्या विरोधात तक्रार केली. यादरम्यान तिच्या पतीने हा प्रकार समोर येताच तिला घटस्फोट दिला. यामुळे महिलेने आत्महत्येचा इशारा दिला. लांबेनी २८ जानेवारी २०२२ ला तिच्या पतीविरोधात चोरीची तक्रार करत त्याला जेलमध्ये पाठवले.असेही विधानसभेत फडणवीस यांनी सांगितले. तसेच अर्शद खानचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासा त्यात दाऊद संदर्भात खुलासे अ्सल्याचेही फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. यावेळी दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर घेतल्याबद्दल फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.