संजय राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…

संजय राऊत यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत आपली प्रतिक्रिया दिलीय.

CM-Eknath-Shinde-On-Sanjay-Raut
संजय राऊत यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत आपली प्रतिक्रिया दिलीय.

CM Eknath Shinde On Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत आपली प्रतिक्रिया दिलीय.

‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’, असं संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत. हे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या आरोपानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली आहे. संजय राऊत यांनी सुरक्षेसाठी केलेली मागणी आता मान्य करण्यात आली असून संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता संजय राऊतांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस आणि गा़ड्यांच्या ताफ्यात एक वाहन तैनात असणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली. माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यात येईल. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची समिती निर्णय घेईल. राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी होईल. ही स्टंट बाजी आहे का हे ही तपासली जाईल. कोण विरोधीपक्षात आहे. याचा विचार न करता गरज असल्यास सुरक्षाही पुरवली जाईल.”