Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMaharashtra Election 2024 : लोकल सुरूच... कोणताही व्यत्यय न आणता रेल्वे कर्मचाऱ्यांचे...

Maharashtra Election 2024 : लोकल सुरूच… कोणताही व्यत्यय न आणता रेल्वे कर्मचाऱ्यांचे मतदान

Subscribe

मुंबईतील लोकल कर्मचाऱ्यांनी लोकल बंद न ठेवता किंवा लोकल सेवेत कोणताही व्यत्यय न पडू देता मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्यामुळे त्यांचे रेल्वे प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मुंबईतही मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक मतदारांनी ऑफिसला वेळेत जाता यावे, याकरिता सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क पार पडला. त्यामुळे यंदाच्या वर्षी गेल्या 30 वर्षांपेक्षा सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पण या सगळ्यांमध्ये सध्या कौतुक होत आहे ते मुंबईतील लोकल कर्मचाऱ्यांचे… कारण या लोकल कर्मचाऱ्यांनी लोकल बंद न ठेवता किंवा लोकल सेवेत कोणताही व्यत्यय न पडू देता मतदानाचा हक्क बजावला आहे. (Maharashtra Election 2024 Railway employees voted without any disruption to Mumbai local services)

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवा बुधवारी 100 टक्के सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पण असे असतानाही रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत चार तासांची विशेष सूट दिली होती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी रेल्वेची नियमित सेवा अबाधित राहिली असून, प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी सुट्टी देण्यात आली होती. कामाच्या वेळेनुसार चार तासांची सुटी घेऊन अनेक कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता.

- Advertisement -

हेही वाचा… Maharshtra Election 2024 : मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढला, फायदा की फटका?

मतदानाच्या ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे बुधवारी 12 अतिरिक्त लोकल चालविण्यात आल्या होत्या. मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण अप-डाउन आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान या लोकल चालविण्यात आल्या. निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणांवर मोठी जबाबदारी असते. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लोकल दिवसभरात वेळेवर धावल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. “आम्ही नेहमी प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असतो. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळालेली ही संधी आमच्यासाठी महत्त्वाची होती,” असे मत एका मोटारमनने व्यक्त केले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -