मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. राज्यात यंदा महायुतीने मुसंडी घेतली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. महायुतीची सत्ता स्थापन होणार असतानाही अद्यापही त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आता मुंबईतील नेमक्या किती जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, याबाबतची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 36 विधानसभांमध्ये एकूण 420 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यातील 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती देण्यात आली असून यामध्ये जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 20 उमेदवारांचा समावेश आहे. (Maharashtra Election Result 2024 How many candidates in Mumbai lost their deposit?)
मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमधून एकूण 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामधील केवळ 75 उमेदवारांचे डिपॉझिट वाचले असून इतर 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अजित पवार गटाचे मानखुर्द विधानसभेतील उमेदवार नवाब मलिक यांनीही डिपॉझिट गमावले आहे. तर काही उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यापुरतीही मते मिळवता आली नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघात मुंबईत सर्वाधिक 22 उमेदवार रिंगणात होते. त्यातील फक्त शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अनंत (बाळा) नर आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांना आपले डिपॉझिट वाचविता आले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील एकूण 20 उमेदवारांनी आपली भरलेली रक्कम गमावली आहे.
हेही वाचा… Maharashtra Election 2024 : ईव्हीएम है तो मुमकीन है, विधानसभा निकालावरून ठाकरे गटाचा घणाघात
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी वि. महायुती अशी खरी लढत पाहायला मिळाली. त्यातही मुंबईत 36 विधानसभांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे 14 उमेदवार विजयी झाले असून यामध्ये समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा समावेश आहे. तर भाजपाचे नाना आंबोले यांनी शिवडी मतदारसंघातून, वर्सोवा येथून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि वांद्रे पूर्वमधून शिंदे गटाचे कुणाल सरमळकर हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते. या तिघांसह एमआयएमच्या भायखळा, वर्सोवा, कुर्ला, मानखुर्द येथील उमेदवारांनीही आपले डिपॉझिट वाचवले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकापासून पुढील सर्व उमेदवारांनी डिपॉझिट गमावली आहेत. पहिल्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त सर्वांचीच अनामत रक्कम सर्व मतदारसंघांत जप्त होणार असली तरी माहिम, मानखुर्द, अणुशक्तीनगर या तीन मतदारसंघांत तीन उमेदवारांनी भरघोस मते घेऊन निवडणुकीत चुरस आणली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट वाचले आहे.