Coronavirus : मंत्र्यांपाठोपाठ आता मंत्री कार्यालय अन् बंगल्यातही कोरोनाचे थैमान

varsha bunglow corona positive

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज नवे उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटीही या कोरोनाच्या संसर्गातून सुटले नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या राजकीय नेत्यांच्या मुलांचे लग्नसमारंभ आणि राजकीय कार्यक्रम पाहता कोरोनाने राजकीय नेतेमंडळींना मोठ्या प्रमाणात गाठले आहे. पण राजकीय नेतेमंडळी, मंत्र्यांपाठोपाठच आता मंत्री कार्यालयातील कर्मचारीही कोरोनाच्या संसर्गाच्या चक्रात अडकले आहेत. मोठ्या प्रमाणात मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होताना दिसून आले आहे. (Maharashtra minister and minister staff corona positive due to covid-19 infection )

शासकीय निवासस्थानातही कोरोनाचे थैमान 

राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदार यांच्या पाठोपाठ आता मंत्री कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानातही करोनाने शिरकाव केला असून त्यांच्या निवासस्थानातील २२ जणांना करोनाची लागण झाली आहे.

भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामटेक बंगल्यावर गेली दोन दिवस करोनाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यात काही कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेतल्या असून २२ जण पॉझिटिव्ह आढळले. तर,काहींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे येथील बाधितांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे.

त्याचबरोबर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा समावेश असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरू असताना ५ दिवसांत १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली. तसेच कालच राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या काळात १० मंत्र्यांना आणि २० पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा आकडा अजितदादांनी सांगितला होता. आता हाच मंत्र्यांचा आकडा १३ झालेला आहे. तर राज्यात ७० आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे.


corona virus : महाराष्ट्रातील 13 मंत्र्यांसह 25 बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह