अयोध्येतून आणलेल्या धनुष्यबाणासह शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात

घाटकोपर पश्चिम मधील अमृतनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरूवात झाली आहे.

Ashirvad-Yatra-BJP-Mumbai
घाटकोपर पश्चिम मधील अमृतनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरूवात झाली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे हे त्यांच्या खेडमधील शिवसंवाद यात्रेसाठी ग्रॅण्ड एंट्री करत सभेस्थळी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं मुंबई जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेला जोरदार सुरूवात झाली असून हजारोंच्या संख्येने शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पहायला मिळतंय.

उद्धव ठाकरे गटाच्या सध्या सुरु असलेल्या शिवगर्जना यात्रेला जोरदार प्रतिउत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजपची ‘आशीर्वाद यात्रा’ राज्यात सुरु झालीय. याची सुरूवात मुंबईपासून झाली असून घाटकोपर- मुलुंड दरम्यान ही आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्त्यूत्तर देण्यासाठी या आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.

घाटकोपर पश्चिम मधील अमृतनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरूवात झाली आहे. या चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आशीर्वाद यात्रेला सुरूवात करण्यात आलीय. या आशीर्वाद यात्रेत जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन शिवसेना-भाजपचा झेंडा फडकवत सहभागी झाले आहेत. ही यात्रा विक्रोळीपर्यंत पोहोचली असून एलबीएस मार्ग, बाळराजेश्वर मंदिरापर्यंत ही आशीर्वाद यात्रा निघणार आहे.

अयोध्येतून आणलेला शिवधनुष्य मिरवत ही आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. तसंच आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात देखील संध्याकाळी ५ वाजता ही आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना-भाजपचे बडे बडे नेते देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाच्या आजवरच्या आरोपांना शिंदे गटाकडून उत्तर दिले जाणार, असं देखील सांगण्यात येत आहे.

या यात्रेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार राम कदम, खासदार मनोज कोटक, मुलुंडचे आमदार मिहिर चंद्रकांत कोटेचा, घाटकोपरचे आमदार पराग शाह यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत. या यात्रेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. यावेळी माध्यमाशी बोलताना आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. “भाजप आणि शिवसेना, सोबतच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे.” असं यावेळी आशिष शेलार म्हणाले.