घरमुंबईसत्ता संघर्षाच्या निकाल विधानसभा अध्यक्षांच्या हाती?

सत्ता संघर्षाच्या निकाल विधानसभा अध्यक्षांच्या हाती?

Subscribe

प्रकरण माझ्या हाती आल्यास सेनेच्या १६ आमदारांना अपात्रच करेन - झिरवळ

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सत्ता संघर्षाचा निकाल ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर स्वत: निर्णय घेण्याची शक्यता कमी असल्याचे कायदेतज्ज्ञांना वाटत आहे. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालय या आमदारांना अपात्र ठरवायचे की नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकते, असेही म्हटले जात आहे. तसे झाल्यास केवळ एकच मुद्दा शिल्लक राहतो, तो म्हणजे हे अधिकार जुन्या परिस्थितीनुसार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जातील की सद्यस्थितीनुसार विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे. त्यावर भाष्य करताना हे प्रकरण माझ्याकडे आल्यास १६ आमदारांना मी अपात्रच करेन, असे नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच सरकारविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील फूट घटनात्मकदृष्ठ्या वैध की अवैध? मुख्यमंत्र्यांसह त्यांचे १६ सहकारी अपात्रतेच्या कारवाईपासून वाचणार की नाही? सरकारला धोका आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार, असा प्रश्न नरहरी झिरवळ यांना करण्यात आला.

- Advertisement -

त्यावर उत्तर देताना झिरवळ म्हणाले की, न्यायालय काय निकाल देईल हे आताच सांगता येत नाही. हे प्रकरण माझ्याकडे आल्यावर त्यांना मी पुन्हा अपात्रच करेन. मी घटनेला धरून माझा निर्णय दिला होता. त्यामुळे मी दिलेला निर्णय बरोबर आहे. समजा निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला तर मी चुकीचा निर्णय दिला होता असा त्याचा अर्थ निघेल. मग घटना चुकली असे म्हणता येईल का, असा उलट प्रश्नही झिरवळ यांनी केला.

तर मला मुख्यमंत्री करा
सत्ता संघर्षाचा निकाल विरोधात जाऊन सरकार पडल्यास काय करणार, असे विचारले असता, तर मी म्हणेल मलाही मुख्यमंत्री करा, परंतु त्यासाठी संख्याबळ हवे ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असे समजायचे. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -

अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले की, अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याची एक ते दीड महिन्यापासून चर्चा आहे, पण अशा चर्चांना काहीच अर्थ नाही. या चर्चांचा आणि शरद पवार यांचा राजीनामा याचा काहीएक संबंध नाही, असा दावाही त्यांनी केला.

अ‍ॅड. राहुल नार्वेकर आजपासून लंडन दौर्‍यावर
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या ५ सदस्यीय घटनापीठातील न्यायमूर्ती शहा हे १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार यादरम्यान घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर ९ ते १५ मेदरम्यान लंडन दौर्‍यावर जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री ते मुंबईतून निघणार असून १५ मे रोजी परतणार आहेत. एका चर्चासत्रासाठी ते जात असल्याचे म्हटले जात आहे.

सत्तासंघर्षावरील निकाल या आठवड्यातचलागण्याची शक्यता आहे. कारण घटनापीठातील एक न्यायमूर्ती १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.निकाल काय लागतोय याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -