गणेश नाईक यांना धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज एकत्र येणार

mahavikas aghadi

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीचे नेते नवी मुंबईच्या मैदानात उतरणार आहेत. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आघडीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी व सहकार मंत्री विश्वजित कदम हे प्रमुख नेते तसेच अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा आघाडीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका महाविकास आघाडीच जिंकणार आहे, त्याच्या बांधणीची ही सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी व्यक्त केली.