हातात भोपळे घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, काय आहे मागणी?

यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

Mahavikas Aghadi Group

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर झाला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी वेगवेगळ्या टीकेला सुरूवात केलीय. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी हातात भोपळे आणि कोहळे घेऊन आंदोलन केलंय. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

सध्या राज्यातील कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळं कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, त्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. तसंच अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. हाती आलेली पीक या अवकाळी पाऊस आमि गारपीटीमुळं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. त्यावरही सरकारनं अद्याप निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दोन्ही मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

याविरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी हातात भोपळे दाखवून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी ‘बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा’ सह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. “महाराष्ट्राला मिळाला भोपळा, कांदा उत्पादकांना मिळाला भोपळा, कापूस उत्पादकाला मिळाला भोपळा, शेतकऱ्यांना मिळाला भोपळा” , अशा घोषणाही यावेळी विरोधकांनी केल्या. ‘सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके…’ असे फलक देखील यावेळी झळकवण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

Mahavikas-Aghadi-Andolan

गेल्या दोन दिवसांपासून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी गळ्यात कांद्याच्या माळा आणि कापसाच्या माळा घेऊन आंदोलन केलं होतं. आज पुन्हा विरोधकांनी हातात भोपळे घेऊन हे आंदोलन केलंय.