विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बोटावर मोजण्याएवढे आमदार निवडून आले आहेत. लोकसभेला हवेत गेलेल्या महाविकास आघाडीचा फुगा विधानसभेला फुटला आहे. आता विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. याचं कारण आहे, सध्या असलेलं सध्याचं महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ.
2 एप्रिल 2026 ला शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या 4 आणि महायुतीच्या राज्यसभेच्या 2 जागा रिक्त होणार आहेत. सध्याचं संख्याबळ पाहता 2026 ला महाविकास आघाडीला राज्यसभेतील एकच जागा निवडून आणता येऊ शकते. त्यांना 3 जागा गमवाव्या लागू शकतात. तर, महायुतीला 5 जागांवर विजय मिळवता येऊ शकतो.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांचीही मुदत 2028 ला संपत आहे. मात्र, त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्यानं अडचण निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 131, शिवसेना ( शिंदे गट ) 57, राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) 41 अशा महायुतीला 229, तर काँग्रेस, 16, शिवसेना ( ठाकरे गट ) 20, राष्ट्रवादी ( शरद पवार ) 10 अशा महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा : मनसेचा बडा नेता महायुतीवर भडकला; म्हणाले, “राज ठाकरेंनी एवढी मदत केली, पण…”
राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 42 मतांची आवश्यकता असते. पण, महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कोणत्याही एका पक्षाला 20 पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे राज्यसभा निवडणूक लढायचं ठरवलं तर फक्त एकच जागा निवडून आणता येण्यासारखं संख्याबळ महाविकास आघाडीकडे. त्यामुळे 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत 3 जागांवर पाणी सोडावं लागणार आहे.
2 एप्रिल 2026 ला कुणाची मुदत संपणार?
- प्रियंका चतुर्वेदी (उद्धव ठाकरे गट)
- फौजिया खान (शरदचंद्र पवार गट)
- रजनी पाटील (काँग्रेस)
- शरद पवार (शरदचंद्र पवार पक्ष)
- धैर्यशील पाटील (भाजप)
- रामदास आठवले (रिपाइं)
4 जुलै 2028
- इम्रान प्रतापगढी (काँग्रेस)
- संजय राऊत (ठाकरे गट)
शरद पवारांचे निवृत्तीचे संकेत…
दरम्यान, शरद पवार यांनी राज्यसभा लढवणार नसल्याचे सांगत राजकीय निवृत्तीचे संकेत विधानसभेवेळी दिले होते. “मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : ‘मविआ’तून बाहेर पडा, हिंदुत्त्वासाठी स्वतंत्र लढा; पराभूत उमेदवारांची ठाकरेंकडे मागणी, पण…