८ लाख ग्राहकांचे वीजबिल महावितरणने केले माफ

वीजबिलाची वसुली करण्यासाठी या वीज ग्राहकांविरोधात न्यायिक लढा देण्याचा खर्च हा महावितरणच्या वीजबिलाच्या रकमेपेक्षा अधिक आहे. साधारणपणे एका वीज ग्राहकाविरोधात न्यायालयीन प्रक्रियेनुसार वीजबिल वसुलीची प्रक्रिया ही साधारणपणे ५ हजार ते ६ हजार रूपयांच्या घरात जाते.

mahaviran
महावितरण (प्रातिनिधीक फोटो)

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असाच अनुभव महावितरणलाही सुटलेला नाही. वीजबिल वसुल करताना नाकी नऊ आणलेल्या ठग ग्राहकांपुढे महावितरणने अखेर लोटांगण घातले आहे. या वीज ग्राहकांना आता महावितरणने रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.एक हजार रूपयांपेक्षा कमी वीज बिल असणाऱ्या तब्बल 8 लाख थकबाकीदार वीज ग्राहकांवर महावितरण मेहरबान झाले आहे. राज्यातील आठ लाख वीज ग्राहकांचे तब्बल 30 कोटी रूपये माफ करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

साधे ५० रुपये बीलही भरले नाही

गेल्या अनेक वर्षांपासून या वीज ग्राहकांनी वीजबिल भरले नव्हते. अगदी 50 रूपये न भरलेले वीज ग्राहकही या यादीत होते. महावितरणने या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून खंडीत केला आहे. वीज ग्राहकांना वीजबिल न भरल्यासाठी कोर्टातून नोटीस पाठवण्यापासून ते याचिका दाखल करण्यापेक्षा ही प्रकरणे निकाली काढण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

कल्याण परिमंडळात अधिक थकबाकी

राज्यातील प्रत्येक परिमंडलात असे एक हजार रूपयांपेक्षा कमी वीजबिल न भरलेले वीज ग्राहक आहेत. सर्वाधिक थकबाकीदार वीज ग्राहक हे कल्याण परिमंडलातील आहे. कल्याणमधील १ लाख १४  हजार वीज ग्राहकांनी तब्बल ४ कोटी २९ लाख रूपयांचा वीजबिल भरणा केलेला नाही. तर कल्याणपाठोपाठ लातुर, जळगाव, बारामती, नाशिक अशा परिमंडलाचा समावेश आहे. भांडूप परिमंडळात नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील वीज ग्राहकही एक हजार रूपयांपेक्षा कमी बिल असलेल्यांच्या थकबाकीदारांच्या यादीत आहेत हे विशेष. राज्यातील ७ लाख २९ हजार वीज ग्राहकांनी एक हजार रूपयांपेक्षा कमी वीजबिल असतानाही वीजबिलभरणा केलेला नाही. या वीज ग्राहकांकडून २९ कोटी ९० लाख रूपये वसुल करता आले नाहीत. त्यामुळे महावितरणने या थकबाकीदार वीज ग्राहकांनी प्रकरणे निकाली काढण्याचे ठरविले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंतच्या वीज ग्राहकांची वीजबिले महावितरणने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे यंत्रणेत थकबाकीदार म्हणून दिसणारे हे वीज ग्राहक आता यामुळे नाहीसे होतील.

न्यायिक लढा बिलापेक्षा अधिक

वीजबिलाची वसुली करण्यासाठी या वीज ग्राहकांविरोधात न्यायिक लढा देण्याचा खर्च हा महावितरणच्या वीजबिलाच्या रकमेपेक्षा अधिक आहे. साधारणपणे एका वीज ग्राहकाविरोधात न्यायालयीन प्रक्रियेनुसार वीजबिल वसुलीची प्रक्रिया ही साधारणपणे ५ हजार ते ६ हजार रूपयांच्या घरात जाते. त्यामुळे अशा वीज ग्राहकांविरोधात कोणतीही न्यायिक प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. वीज ग्राहकांची थकबाकी राहणार नाही याची खात्री यापुढे महावितरणने यापुढच्या काढात घेण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

थकबाकीदार वीज ग्राहक परिमंडळनिहाय

परिमंडळ थकबाकीदार ग्राहक थकबाकीची रक्कम

अकोला             ४४,२६६ २ कोटी १० लाख

अमरावती           ४२,२८७ २ कोटी १ लाख

औरंगाबाद         २८,३३१ १ कोटी २५ लाख

बारामती           ६४,४८८ २ कोटी ७१ लाख

भांडूप              २६,४६८ ९० लाख २६ हजार

चंद्रपूर             २०,९४६ ९६ लाख ८९ हजार

गोंदिया            १६,०९४ ६६ लाख २४ हजार

जळगाव           ५९,७३८ २ कोटी ९५ लाख

कल्याण           १,१४,००० ४ कोटी २९ लाख

कोकण           १२,०८७ ४५ लाख ४२ हजार

कोल्हापूर        ३९,५१५ १ कोटी ५८ लाख

नागपूर           ४०,३९१ १ कोटी ६७ लाख

नाशिक        ८२,३२३ ३ कोटी ३० लाख

पुणे            ५३,३८६ १ कोटी ८६ लाख

लातुर         ५८,४५३ २ कोटी १० लाख

नांदेड        २६,०४७ १ कोटी ३ लाख