Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन महेश मांजरेकरांचे गिरणी कामगारांच्या स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण, 'नाय वरणभात लोन्चा' प्रोमोवर राज्यभरातून...

महेश मांजरेकरांचे गिरणी कामगारांच्या स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण, ‘नाय वरणभात लोन्चा’ प्रोमोवर राज्यभरातून संताप

Subscribe

केंद्रीय महिला आयोगाने या वादग्रस्त प्रोमोची गंभीर दखल घेत चित्रपटातील संंबंधित दृश्य काढून टाकण्याची मागणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे करत त्यांना नोटीस बजावली आहे. 

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटावरून मुंबईसह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. लालबाग -परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो सोमवारी रिलीज झाला असून चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केले असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. त्यामुळे मुंबईत सर्व स्तरातून या चित्रपटाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गिरणी कामगार आणि मराठीच्या मुद्यावर कायम आक्रमक असणारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत. मात्र,केंद्रीय महिला आयोगाने या वादग्रस्त प्रोमोची गंभीर दखल घेत चित्रपटातील संंबंधित दृश्य काढून टाकण्याची मागणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे करत त्यांना नोटीस बजावली आहे.

दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी त्या नावामध्ये देखील बदल केला आहे. तसेच, त्यात गिरणी कामगारांविषयी हिडीस पद्धतीचे चित्रीकरण केले आहे. महेश मांजरेकर यांच्याबाबतीत हे पहिल्यांदाच असे घडलेले नाही. याआधी देखील त्यांनी जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. दरम्यान आता ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रोमोमधील काही दृश्यांवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

- Advertisement -

गिरणी कामगार संपामुळे जरी थोडा खचला तरी त्याने हार मानली नाही. घरातल्या घरधन्यासोबत त्याची पत्नी कामासाठी बाहेर पडली. मुलांनी नाईट कॉलेज करून शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक गिरणी कामगारांची मुले आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. असे असताना महेश मांजरेकर पैसा, प्रसिद्धीसाठी मराठी माणसांची, गिरणी कामगारांची अब्रू वेशीवर टांगत आहेत. हे करत असताना मराठी माणसांसाठी झटतो म्हणून सांगणारे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष गप्प का बसलेत? शिवसेनेची आणि मनसेची चित्रपट सेना यावर मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल आता विचारला जात आहे.

महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा मराठी माणूस आणि गिरणी कामगारांच्या पिढीला बदनाम करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या गोष्टीला चाप बसायलाच हवा. चाळीतली संस्कृती बदनाम करून मराठी माणसाची अब्रू वेशीवर टांगली जात असताना आपण गप्प बसणार का? – गणेश देसाई

- Advertisement -

देशोधडीला लागलेल्या सर्वच गिरणी कामगारांच्या बायका-मुली जणू शरीरविक्री करत होत्या, त्यांची मुले फक्त अंडरवर्ल्डमध्ये होती अशा पद्धतीने दाखवले. चाळ संस्कृतीबाबत ‘प्राण जाये पर शान न जाये’ नावाचा आणखी एक तद्दन फालतू चित्रपट यांनी केला. संजय पवार या उत्तम लेखकाच्या ‘सती’ या एकांकिकेवर आधारित. संजय पवार यांना तर चित्रपट बघून तोंड लपवावे लागले असेल. प्रत्येक चाळीत एक दारुडा माणूस, एक ‘चालू’ बाई, वगैरे इतकी प्रेडिक्टबेल पात्रे करतो. त्यांचा नवा चित्रपट पण असाच असेल, त्यात अशीच पात्रे असतील यात काहीच शंका नाही. – नितेश सुतार

मी जयंत पवार यांची ‘वरडभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ कथा दोनदा वाचली आहे. कथा वाचताना अंगावर शहारे येतात. त्यात गिरणी कामगार आणि त्यांच्या मुलांची परिस्थितीनुसार झालेली वाताहत आहे. ती तशीच आली असती तर मूळ अधांतर नाटकासारखी दाहकता अंगावर आली असती. मुळात नावात सुद्धा गडबड केली आहे. वरणभात लोन्चा…असे असताना ‘नाय वरणभात लोन्चा… असं धेडगुजरी केले आहे. यावर एक उपाय या सिनेमावर बहिष्कार अशी सोशल मीडियावर आपण मोहीम चालवू. – संजय परब


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -