महेश मांजरेकरांची शरणागती

गिरणी कामगारांच्या कुटुंबातील स्त्रियांची हिडीस दृश्य सिनेमातून वगळली

Mahesh Manjrekar reaction over controversy of new movie nai varan bhat loncha kon nai koncha bold scenes

‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या प्रोमोवरून सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने अखेर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शरणागती पत्करली आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकली असे सांगत मांजरेकर यांनी जाहीर माफी मागितली आहे. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये गिरणी कामगारांच्या कुटुंबातील स्त्रियांसंदर्भात हिडीसपणे चित्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर ‘आपलं महानगर’ ने यासंदर्भात बातमी करत ‘वरणभात लोन्चा, महेश मांजरेकर सांगा कोन्चा’, असा सवाल केला होता.

‘नाय वरणभात लोन्चा…’ या चित्रपटाचे प्रोमो अगोदर प्रसिद्ध झाले होते. त्यात गिरणी कामगारांच्या कुटुंबातील स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण असल्याचे समोर आले होते. आपलं महानगरने त्याची बातमी करून ही बाब जनतेपुढे मांडली. ‘आपलं महानगर’ च्या बातमीनंतर गिरणी कामगार संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत चित्रपटावर बंदीची मागणी केली. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आली आहेत. प्रोमो समाजमाध्यमांवरून हटवण्यात आला आहे.

लालबाग -परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारति ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो सोमवारी रिलीज झाला. या प्रोमोतील दृश्यांवरून समाजमाध्यमांवर संताप व्यक्त होत होता. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा मराठी माणूस आणि गिरणी कामगारांच्या पिढीला बदनाम करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या गोष्टीला चाप बसायलाच हवा. चाळीतली संस्कृती बदनाम करून मराठी माणसाची अब्रू वेशीवर टांगली जात असताना आपण गप्प बसणार का? असा सवाल मराठी माणूस विचारु लागला. चित्रपटाबाबत मुंबईतील सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना हे प्रकरण शेकू नये म्हणून महेश मांजरेकर यांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली.

चित्रपटाच्या प्रोमोची राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क आयोगानंतर राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली. त्यानंतर मांजरेकर यांना नोटीस बजावत लेखी खुलासा करण्यास सांगितले. दरम्यान, सर्वच स्तरावरून होणारी टीका आणि महिला आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर चित्रपटाचा प्रोमो सर्वच प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. प्रोमोमधील दृष्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह दृष्ये केवळ प्रोमोमधूनच नव्हे, तर चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत. –महेश मांजरेकर