कोरोनापाठोपाठ मुंबईकरांच्या डोक्याला नवीन ताप; जूनमध्ये आढळले मलेरियाचे ३२८ रुग्ण

Malaria viral
प्रातिनिधिक छायाचित्र

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ हे आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. जुन महिन्यातच मलेरीयाचे तब्बल ३२८ रुग्ण आढळल्याने जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या मुंबईकरांच्या समोर आता मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, लेप्टो आणि डेंग्यू हे आजारही डोके वर काढू लागले असून आरोग्य विभागाच्या चिंतेत भरच पडली आहे.

मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनीया, लेप्टो, कावीळ साथीचे हे आजार पावसाळ्यात झपाट्याने पसरतात. कोरोना विरोधात लढ्यात आरोग्य यंत्रणा आधीच रात्रंदिवस झटत आहे. त्यात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जुन २०१९ मध्ये मलेरियाचे ३१३ रुग्ण आढळले होते. तर यंदा जुन २०२० मध्ये हा आकडा वाढला असून ३२८ रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत. तर डेंग्यूचे ४, तर लेप्टोचा एक रुग्ण आढळल्याने कोरोना पाठोपाठ आता साथीच्या विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोना विरोधात लढा देत असताना आता पावसाळी आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाॅन कोविड रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डातील दोन ते तीन दवाखाने, प्रसुतीगृह, हेल्थ पोस्ट या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, हिवताप, अतिसार, कावीळ, लेप्टो अशा विविध आजारांवर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. पावसाळ्यात उद्भवणारे हे आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणू बरोबर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याचे आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला जात असून ती नष्ट करण्यात येत आहेत.

वर्ष – मलेरिया रुग्ण
जुन २०२० – ३२८
जुन २०१९ – ३१३

वर्ष – डेंग्यू रुग्ण
जुन २०२० – ४
जुन २०१९ – ८

—-

वर्ष – लेप्टो
जुन २०२० – १
जुन २०१९ – ५