मुंबई : सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या एका आरोपीस कुर्ला पोलिसांनी अटक केली. आमीर फिरोज मणियार असे या आरोपीचे नाव असून त्याने गेल्या दोन महिन्यांत एका नामांकित बँकेत 35 बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (man arrested for providing bank accounts to cyber thugs; 35 bank accounts opened in two months)
तक्रारदार कुर्ला येथील एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला बंगलोर सायबर पोलिसांकडून एक मेल आला. त्यांच्या बँकेत उघडण्यात आलेल्या पाच बँक खात्यात ऑनलाइन फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या मेलनंतर बँकेच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली. याच दरम्यान तक्रारदाराला एक व्यक्ती नियमित काही लोकांसोबत येत असल्याचे दिसले.
हेही वाचा – Mumbai Crime : टॉवेलने गळा आवळून पत्नीचा खून; मलबार हिल पोलिसांनी केली पतीला अटक
याबाबात चौकशी केल्यानंतर तो अनेकांना बँक खाती उघडून देण्यास मदत करत असल्याचे त्यांनी सांगण्यात आले. त्याने त्याच्या दहा नातेवाईकांची बँकेत खाती उघडली होती. कर्जत येथे राहणार्या या व्यक्तीचा आयात-निर्यातीचा व्यवसाय असल्याचे उघडकीस आले. दोन दिवसांपूर्वी तो बँकेच्या एटीएमजवळ आला होता. त्याच्यावर संशय निर्माण झाल्याने त्याला बँक अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने दोन ते तीन महिन्यांत त्यांच्या बँकेत 35 हून अधिक बँक खाती उघडल्याचे समोर आले. त्यापैकी पाच बँक खात्यात ऑनलाइन फसवणुकीची रक्कम जमा झाली होती.
ऑनलाइन फसवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्याचे बिझनेस खाते असून त्यात काही पार्टीकडून पेमेंट आल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच बँकेने ही माहिती कुर्ला पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो सायबर ठगांना मदत करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खात्यांचे डिटेल्स पुरविले होते. त्याने बँकेतून व्हिसा कार्ड घेतले होते. त्यातील व्यवहाराची चौकशी केल्यानंतर त्यातील सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद दिसून आले होते. तसेच बँक खात्यात जमा झालेली रक्कम एटीएममधून काढल्याचे उघडकीस आले होते.
हेही वाचा – Pakistan Terrorist Attack : प्रवासी वाहनांवर दहशतवादी हल्ला; 50 लोकांचा मृत्यू
चौकशीत हा प्रकार उघड होताच बँकेच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आमीर मणियारविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (man arrested for providing bank accounts to cyber thugs; 35 bank accounts opened in two months)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar