घरCORONA UPDATEऑनलाईन घ्यायला गेला आलू भुजिया शेव, बसला २.२५ लाखांचा झटका!

ऑनलाईन घ्यायला गेला आलू भुजिया शेव, बसला २.२५ लाखांचा झटका!

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे दुकानं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे काही खासगी ऑनलाईन वेबसाईट्सने घरात लागणाऱ्या वस्तू आणि किराणाची ऑनलाईन ऑपिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यातूनच ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांचं फावत असून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे. अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या असून या दरम्यान बोरिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने फक्त ४०० रुपये किंमतीच्या स्नॅक्ससाठी केलेल्या फोनमुळे त्याला तब्बल २ लाख २२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. शनिवारी यासंदर्भातली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

तर झालं असं की….

मुंबईच्या बोरीवली भागामध्ये पेशाने व्यवसायिक असणाऱ्या एका व्यक्तीने २२ एप्रिल रोजी एका ऑनलाईन किराणा पुरवणाऱ्या वेबसाईटवरून घरासाठी किराणा मालाची ऑर्डर दिली. जेव्हा ठरवून दिलेल्या दिवसांनंतर त्याच्या घरी माल पोहोचला, तेव्हा त्यामध्ये ४०० रुपये किंमतीची आलू भुजियाची दोन पाकिटं नव्हती. यावर १ मे रोजी या व्यक्तीने या वेबसाईटचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्यासाठी गुगलची मदत घेतली. गुगलवर सर्च करून या कंपनीचा नंबर मिळवला आणि कॉल केला.

- Advertisement -

पण फोन केला आणि घात झाला!

संबंधित व्यक्तीने फोन केलेला गुगलवरचा नंबरच बनावट होता! पण हे त्याला समजलं, तोपर्यंत फार उशीर झाला होता. हा फोननंबर एका ऑनलाई फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीने अपलोड केला होता. पीडित व्यक्तीने फोन केला तेव्हा त्याला समोरून त्याचे बँक अकाऊंट डिटेल, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि एटीएम कार्डच्या मागचा तीन आकड्यांचा सीव्हीव्ही नंबर मागितला. हे सगळं त्या व्यक्तीने दिलं. पुढे समोरच्या व्यक्तीने त्याला मोबाईलवर एक लिंक पाठवली. ही लिंक दुसऱ्या एका नंबरला फॉरवर्ड करायला सांगितली. त्यानंतर त्यानं पीडित व्यक्तीला त्याचा मोबाईल ट्रान्सफर युपीआय पीन आणि ओटीपी मागितला. तोही यानं दिला.

..आणि अवघ्या काही मिनिटांत लाखोंचा झटका बसला!

जोपर्यंत फिर्यादी व्यक्तीला काही कळणार, तोपर्यंत त्याच्या अकाऊंटमधून चार वेगवेगळ्या ट्रान्जॅक्शनमधून २ लाख २५ हजार रुपये वजा झाले होते. झाल्या प्रकारात आपण पैसा गमावून बसलो आहोत हे लक्षात येताच या व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आणि सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला. आपल्या आसपास इतक्या सगळ्या घटना घडत असूनही अजून लोकं आपले बँक डिटेल्स, ओटीपी, पीन कसे काय इतरांना देतात? याचं आश्चर्य पोलिसांकडून व्यक्त केलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -