घरठाणेएपीएमसीच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली

एपीएमसीच्या बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली

Subscribe

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. आंब्याची आवक दिवसागणिक वाढतच असल्याने आंब्याचे दर देखील वाढले आहेत. आगामी काही दिवसात आवक स्थिरावल्यानंतर आंब्याचा आनंद सामान्यांना घेता येईल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. फळ मार्केटमध्ये १४ मार्चच्या रात्रीपर्यंत २६ ट्रक आणि ४१७ लॉरी अशा एकूण ४४३ गाड्यांची आवक झाली आहे. महाराष्ट्रातून २३०३७ तर इतर राज्यातून ६५८२ क्रेट आंबा बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची अधिक आवक बाजारात दाखल झाली आहे. बाहेरील सहा हजार क्रेटमध्ये कर्नाटक आणि केरळचा आंबा आहे. मागील आठवड्यापेक्षा केरळ आणि कर्नाटक आंब्याची आवक घटली असून हापूस आंबा आवक मात्र सहा हजार पटीने वाढली आहे.

देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला ८०० ते २५०० हजार रुपये भाव आहे. तर कर्नाटक आणि केरळ आंबा १०० ते १५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार असल्याची खात्री दिली जात आहे. इतर फळ विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी फळांच्या राजाला मात्र मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आंबा आवक जास्त प्रमाणात आली तरी मालाला उठाव राहणार असून सामान्य माणूस दहा दिवसात आंबा खाऊ शकेल, असे व्यापारी वसंत चासकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मागील वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे एपीएमसी बाजारपेठेत आंब्यांची होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती तर त्यानंतर राज्यातील हवामान बदलाचा फटका आंब्यासह इतर शेती उत्पादनाला बसला होता. हवामान बदलाचा फटका यंदाही शेतकर्‍यांना बसला असून आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

एप्रिल-मे महिन्यात आवक वाढणार
अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी असल्याचे बोलले जात आहे. तर, एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल. त्यावेळी मात्र आंबा सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतो, असा अंदाज व्यापारी विजय ढोले यांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता आली नव्हती. मात्र, यंदा काही उशिरा का होईना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -