घरमुंबईगूढ तळाशी...मृतदेह सापडण्याच्या १२ तास अगोदर मनसुख हिरेन यांचा मृत्यू

गूढ तळाशी…मृतदेह सापडण्याच्या १२ तास अगोदर मनसुख हिरेन यांचा मृत्यू

Subscribe

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर खाडी या ठिकाणी सापडला होता. शनिवारी मनसुख यांच्या मृतदेहाचा विच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला. या अहवालात मनसुख यांचा मृत्यू मृतदेह सापडण्याच्या १२ तास आधी झाला असल्याचे म्हटले आहे. हिरेन यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यंसंस्कार करण्यात आले. तर या प्रकरणात संशयाची सुई असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची तीन तास भेट घेतली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेल्या गाडीचा मूळ मालक हिरेन मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर लक्ष लागले असताना शनिवारी तो रिपोर्ट समोर आला. मनसुख यांच्या नाका तोंडात पाणी गेले असून शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून आले आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी मुंब्राच्या खाडीत आढळून आला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर व्हिडिओ कॅमेर्‍यात पोस्टमार्टम करण्यात आले होते. तब्बल 3 तास पोस्टमार्टम चालले होते. यात ४ डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम केले होते. शिवाय विसेरा आणि फॉरेन्सिकसाठी नमुने पाठवले आहेत. हिरेन मनसुख यांच्या घरच्यांनी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रत दिली आहे. यात मृत्येचे कारण स्पष्ट नसून छातीत काही अंशी पाणी आढळले असून नाकातून रक्त आल्याचे दिसले आहे. मात्र, शरीराच्या बाहेरील बाजूस कोणत्याही जखमा नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

हिरेन यांचा खूनच! कुटुंबियांचा दावा

हिरेन हे उत्तम पोहणारे होते व त्यांना कोणतेही टेन्शन नसल्याने त्यांनी आत्महत्या केली नसून हा खूनच असल्याचा दावा त्यांच्या पत्नी व मित्रानी केल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटकांनी भरलेली हिरेन मनसुख यांची स्कॉर्पिओ गाडी दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर मिळाल्याने गोंधळ उडाला होता. ती गाडी मनसूख हिरेन यांची असल्याचे सिद्ध होताच त्यांच्या पाठी गुन्हे शाखेचा ससेमीरा लागला होता. शुक्रवारी सकाळी देखील ते कांदिवली गुन्हे शाखेच्या तावडे नामक अधिकार्‍याला भेटायला जातो, असे सांगून घरातून निघाले ते पुन्हा परतलेच नसल्याचे त्यांच्या पत्नी आणि भावाने सांगितले.

ते पोलिसाना संपूर्णतः सहयोग करत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? असा सवाल देखील त्यांच्या पत्नी आणि भावाने उपस्थित केला. त्यांच्या मृतदेहच्या चेहर्‍यावर अनेक रुमाल का होते, याचा देखील जाब त्यांनी विचारला. हिरेन मनसूख हे अत्यंत साधे सरळ व्यापारी होते व अव्वल जलतरणपटू असल्याने त्याने खाडीत उडी मारून जीव देणं शक्यच नसल्याचा दावा हिरेन मनसुख यांचे मोठे बंघू विनोद मनसुंक यांनी केला. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

- Advertisement -

पोलीस- पत्रकारांनी छळ केला! मनसुख यांची मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांकडे तक्रार

मनसुख हिरेन यांची आत्महत्या की हत्या याचे गूढ वाढत असताना पोलीस आणि पत्रकारांनी आपला छळ केल्याची तक्रार मनसुख यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे केली होती. मनसुख हिरेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून त्यांना एक फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातूनही ३ वाजता फोन आला. १ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ सुरू असलेल्या चौकशीत सातत्याने परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएने ही चौकशी केली. पुणे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांनीही या प्रकरणात चौकशी केली. विक्रोळी पोलिस, घाटकोपर पोलिस, नागपाड्याचा एटीएस विभाग, गुन्हे गुप्तवार्ता विभाग, गुन्हे शाखा आणि केंद्रीय संस्था एनआयएकडूनही वारंवार चौकशी करून मला तासनतास बसवून ठेवण्यात आले होते असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडल्याचे मनसुख हिरेन यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कित्येक माध्यमांच्या पत्रकारांकडून सतत फोन येत आहेत. यावेळी एका पत्रकाराने कित्येक फोन करुन या प्रकरणातील संशयित असल्याचे देखील सांगितल्याचे मनसुख हिरेन यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर खाडी या ठिकाणी सापडला होता. शनिवारी मनसुख यांच्या मृतदेहाचा विच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला. या अहवालात मनसुख यांचा मृत्यू मृतदेह सापडण्याच्या १२ तास आधी झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतदेहावर कुठल्याही प्रकारचे व्रण नसल्याचे शवविच्छेदन प्राथमिक अहवालात म्हटले असून मृत्यूचे कारण शनिवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ठाण्यातील खोपट येथील डॉ. आंबेडकर मार्गावरील विकास पाम या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीतील चिखलात मिळून आला होता. मनसुख यांनी आत्महत्या केली कि त्याचा घातपात झाला याबाबत गूढ निर्माण झाले होते. मनसुख हिरेन हे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक होते. त्यांची कार विक्रोळी येथून चोरीला गेली होती, त्याची रितसर तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात मनसुख हिरेन हे महत्वाचे साक्षीदार होते.

शुक्रवारी त्याच्या मृतदेह मुंब्रा पोलिसांना सापडल्याने त्यांच्यासोबत नक्की काय झाले, त्यांची हत्या करण्यात आली कि त्यांनी आत्महत्या केली, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. दरम्यान मुंब्रा पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे नेला. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी दुपारी पोलिसांच्या हाती लागला आहे. या अहवालात मनसुख हिरेन यांचा मृत्यू १२ तास अगोदर झाला असून त्यांच्या अंगावर कुठलेही व्रण मिळू आले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार मनसुख यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल अ‍ॅनालिसिसमधून स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत मनसुख यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास मनसुख यांच्या कुटुंबियांनी नकार दिला होता. मात्र मृत्यूच्या प्राथमिक अहवालानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास होकार देऊन सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यूचे गूढ वाढले

मनसुख हिरेन यांना गुरुवारी रात्री तावडे नावाच्या अधिकार्‍याचा फोन येणे, ते घरातून बाहेर पडणे, यानंतर रात्री १० वाजता त्यांचा फोन बंद होणे आणि अचानक दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडणे, हा सर्व घटनाक्रम संशयास्पद आहे. तसेच मनसुख यांच्या तोंडात पाच ते सहा रुमाल कोंबल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. मनसुख यांची आधी हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकला असल्याचा आरोप मनसुख यांचे मोठे बंधू विनोद हिरेन यांनी केला आहे. तसेच रात्री मनसुखला फोन करणारा तो अधिकारी कोण होता, याचा देखील शोध घेण्यात यावा, असेही विनोद यांनी म्हटले आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मनसुख यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट न करण्यात आल्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसई

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला. मात्र त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वसईतील एका गावात मिळून येत आल्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. पोलीस याचा शोध घेत असून मनसुख आदल्या दिवशी वसईला गेले होते का ? याचा तपास केला जात आहे.

गुरुवारी रात्री घरातून तावडे नावाच्या अधिकार्‍याला घोडबंदर येथे भेटून येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेले मनसुख हिरेन यांचा मोबाईल रात्रीच १० नंतर बंद झाला होता. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला. ठाणे पोलिसांनी मनसुख त्यांच्या मोबाईचे लोकेशन तपासले असता गुरुवारी रात्री १०:३० वाजता मनसुख यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन वसई तालुक्यातील एका गावात दाखवत होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

मनसुख यांना फोन करणार्‍या अधिकार्‍याने त्यांना घोडबंदर येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मग त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन वसई येथे कसे काय दाखवत होते, असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. त्यानंतर दुसर्‍याचा दिवशी मनसुख यांचा मृतदेह रेतीबंदर येथील खाडीत चिखलात रुतलेला मिळून आल्यामुळे मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -