घरताज्या घडामोडीशवविच्छेदनाचे व्हिडिओ द्या, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, हिरेन कुटुंबीयांची भूमिका

शवविच्छेदनाचे व्हिडिओ द्या, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, हिरेन कुटुंबीयांची भूमिका

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या कारणावर राजकारण तापलेले असतानाच, आता त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात समोर येऊन बोलायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता कुटूंबीयांनी घेतली आहे. मनसुख हिरेनच्या कुटूंबीयांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना ही माहिती दिली आहे. अॅटॉप्सी अहवाल, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि शवविच्छेदनाचे छायाचित्रिकरण आम्हाला द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणातील प्राथमिक पोस्टमार्टन रिपोर्ट ठाणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. पण यामध्ये मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यामुळेच मनसुख हिरेन यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृतदेह जेव्हा ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे आढळला होता, तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा नसल्याचे स्पष्टीकरण ठाणे पोलिसांनी दिले होते. तसेच मृत्यूच्या वेळी त्यांचे हात बांधले नव्हते असाही खुलासा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हिरेन यांच्या तोंडात कोंबलेल्या रूमालामुळेही या प्रकरणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. तर हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या वेळीही मुंबई पोलिसांमधील अधिकारी सचिन वाझे हजर होते असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली होती.

- Advertisement -

भाजप नेते भेटीला

भाजपचे नेते आणि आमदार मंगलप्रभात लोढा हे मनसुख हिरेन यांच्या ठाण्यातील राहत्या घरी कुटूंबीयांच्या भेटीला गेले होते. भाजपने या संपुर्ण प्रकरणात नॅशनल इनव्हेस्टिगेटींग एजन्सी (एनआयए) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे नेमके काय कनेक्शन आहे ? मनसुख हिरेन ओला करून क्रॉफर्ड मार्केट येथे कोणाला भेटायला गेले होते ? सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे एकमेकांशी फोनवर का बोलत होते असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. पण खुद्द गृहमंत्र्यांनीही या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव घेण्यामागे अर्णब गोस्वामी यांच्या बाबतीतला राग आहे का ? असा प्रश्न सभागृहात केला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -