CoronaVirus – मोदींना ट्रोल करणाऱ्यांवर मराठी कलाकार भडकले!

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुन्हा एखदा संबोधीत केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनीटं दिवे जाळून सामूहीक शक्ती दाखवा असे आवाहन केले. मात्र यावर वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या. मोदींना अनेकांन ट्रोल केलं. मात्र मोदींना ट्रोल करणाऱ्यांना गायक संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेता शशांक केतकरने निशाणा साधला आहे.

सध्या सोशल मीडियावर मोदी आणि त्यांनी केलेलं आवाहन हा एकच चर्चेचा विषय आहे. यावर आता मराठी कलाकार व्यक्त होत आहेत. यावर व्यक्त होताना सलील कुलकर्णी म्हणाला, ‘मेणबत्ती किंवा दिवा लावून काय होणार नाहीए हे खरं आहे पण यावर तर्कशुद्ध बोलणारे गेले दोन दिवस कुठं होते. दिल्लीत हजारोंची गर्दी जमली त्यानंतर त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मारलं नर्सेसवर हल्ला केला… या सर्व प्रकारावर हे सर्व शांत कसे होते? काल परवा त्यांनी सुट्टी घेतली होती का? गेल्या दोन दिवसांत करोना रुग्णांचा आकडा वाढतोय हे खटकलं नाही का? असा प्रश्न सलीलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

तर अभिनेता शशांक केतकरने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘मंडळी नका सतत नावं ठेवू! नका सतत दोष काढू! दिवाळीत पणती लावतो, तसंच फक्त ९ मिनिटं पणती, दिवा, मोबाइलचा फ्लॅश लावायचा आहे तुमच्या घरातच राहून … कॅंडल मार्च काढू नका!’, असं शशांकनं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आवाहन करताना म्हणाले, ‘कोरोनामुळे जो अंधकार निर्माण झालाय, त्याला हरवून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. त्यामुळे या रविवारी ५ एप्रिलला आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला आव्हान द्यायचं आहे. ५ एप्रिलला आपल्याला देशवासियांच्या महाशक्तीचं जागरण करायचं आहे. ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता मला तुम्हा सगळ्यांचे ९ मिनिट हवे आहेत. तेव्हा घरातल्या लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटं लावा. तेव्हा घरातल्या लाईट बंद कराल, सगळीकडे जेव्हा प्रत्येकजण एकेक दिवा लावेल तेव्हा आपली महाशक्ती दिसून येईल. यातून दिसून येईल की आपण कुणीही एकटे नाहीत’. ‘माझी विनंती आहे की यावेळी कुणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही. रस्त्यावर, बाहेर जायचं नाहीये. घराचा दरवाजा किंवा बाल्कनीतूनच हे करायचं आहे’, असं देखील मोदींनी यावेळी आवर्जून सांगितलं.