घरमुंबईMarathi Board : आतापर्यंत 1,100 दुकानांसह आस्थापनांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा

Marathi Board : आतापर्यंत 1,100 दुकानांसह आस्थापनांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा

Subscribe

मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लिहिण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने 28 नोव्हेंबरपासून ते 5 डिसेंबर या कालावधीत तब्बल 21 हजार दुकाने व आस्थपनांची झाडाझडती घेतली तसेच, नियमानुसार मराठीत भाषेत व ठळक अक्षरात पाट्या न लिहिणाऱ्या 1,100 दुकाने व आस्थपनांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Marathi Board Action taken by the municipality on establishments including 1100 shops so far)

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, 2018 व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022 च्या अनुक्रमे नियम 35 व कलम 36 क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. मात्र काही दुकानदारांच्या संस्था पालिकेच्या नियमाला फाट्यावर मारत बिनधास्तपणे आपली दुकानदारी करीत होते.

- Advertisement -

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

अखेर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले व न्यायालयानेच नियमानुसार मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लावण्याबाबत कडक आदेश देत, 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र पुढील दोन दिवस पालिकेला सुट्टी होती. त्यामुळे पालिकेने 27 नोव्हेंबरपर्यंत दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी आणखीन दोन दिवसांची संधी दिली. मात्र दुकानदारांची मुजोरी थांबली नाही. आजही अनेक दुकानांवर नियमानुसार मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत.

- Advertisement -

त्यामुळेच पालिकेने 28 नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत शहर व उपनगरे या ठिकाणच्या तब्बल 20 हजार 923 दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 96 दुकाने व आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – NCRB रिपोर्ट कसा वाचावा याचं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची आवश्यकता; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

प्रति कामगार दोन हजार रुपये दंड

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व आस्थपनांना प्रथमतः तपासणी पत्र सोपवण्यात येते. त्यानंतर दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रति कामगार दोन हजार रुपये दंड आकारला जातो. मात्र त्यांनी सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास प्रतिदिन दोन हजार रुपये याप्रमाणे दंड केला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -