मुंबईकरांना ‘डिजीलॉकर’ मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

मुंबईः मुंबईकरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन ते मोबाईलमध्ये जतन करता येणार आहे. ‘डिजीलॉकर’ प्रणालीद्वारे मुंबई महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पालिकेकडे २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी करणाऱ्यांना ह्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते मंगळवारी या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे, माहिती तंत्रज्ञान खात्याच्या व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाहितांसाठी महत्वाचा वैयक्तिक दस्तऐवज समजला जातो. पासपोर्ट, व्हिजा आणि इतर अनेक शासकीय कामकाजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते.

याप्रसंगी, माहिती तंत्रज्ञान संचालक शरद उघडे म्हणाले की, विवाह नोंदणी प्रमाणपत्र ‘डिजीलॉकर’मध्ये पुरवण्याचा हा उपक्रम महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सहकार्याने राबवला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे व त्यांच्या टीमने यासाठी सहकार्य केले आहे. यापुढे इतरही खात्यांच्या सेवा अशारितीने ‘डिजीलॉकर’मध्ये उपलब्ध करुन देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

आतापर्यंत ३ लाख ८० हजार ४९४ वैवाहिक नोंदणी

मुंबई महापालिकेकडे सन २०१० पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र विषयक कामकाज सुरु झाले असले तरी जानेवारी २०१६ पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन करण्यात आले. मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत वैवाहिक नोंदणीची संख्या तीन लाख ८० हजार ४९४ एवढी आहे.

‘डिजीलॉकर’ विवाह नोंदणी प्रमाणपत्र उपयुक्तः आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त

‘डिजीलॉकर’ ही केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करुन दिलेली शासकीय कागदपत्र मिळवण्याची ऑनलाईन व पेपरलेस सेवा आहे. या सेवेचा उद्देश नागरिकांना मोबाईलमध्येच ऍपद्वारे त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले. विवाह प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन करून नागरिकांवरील ओझे कमी करून त्यांना या महत्त्वाच्या कागदपत्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, हा महापालिकेचा उद्देश असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगितले.