मुंबई (मारूती मोरे) : कुर्ला (प.) एलबीएस मार्ग येथील ‘रंगून ढाबा’ या हॉटेलमध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत हॉटेलसह 5-6 गाळे जळून खाक झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. (Massive fire breaks out at Rangoon Dhaba Hotel on LBS Marg Kurla)
‘रंगून ढाबा’ हॉटेलला आग लागल्यानंतर ही आग हळूहळू पसरली. या आगीची आजूबाजूच्या गाळ्यांनाही झळ बसली. सदर आगीच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर आगीबाबत वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने रात्री 9.17 वाजता आग स्तर-1 ची असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – Vikhroli Best Bus Accident : आगारात उभ्या असलेल्या बसचा अपघात; चालकाविना 40 मीटरपर्यंत पुढे गेली अन्…
या आगीत हॉटेलसह आजूबाजूचे 5-6 गाळेही जळून खाक झाले. यामध्ये काही गाळे एकमजली, दुमजली होते. त्यामुळे आग आणखीन भडकली. अग्निशमन दलाकडून 4 फायर इंजिन आणि 3 जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत हॉटेल आणि गाळ्यांमधील काही सामान जळाले. स्थानिक नागरिकांनी जळालेले हॉटेल, गाळे बघण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.
सदर हॉटेल आणि गाळ्यांच्या ठिकाणी स्थानिक पोलीस, महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका, अदानी वीज कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र सदर हॉटेलमध्ये आग का? आणि कशी लागली? आगीचे नेमके कारण काय? याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी हे अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – Mumbai Metro : मुंबई मेट्रोने गाठला महत्त्वाचा टप्पा, मार्गिक 7 आणि 2 एला सीसीआरएसची नियमीत मंजुरी