माथाडी कामगारांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर माथाडी कामगारांचा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बुधवारी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर माथाडी कामगारांचा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बुधवारी केली आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत माथाडी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनावर माथाडी कामगारांचा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी शिंदे-भाजप सरकारला दिला आहे.

माथाडी कामगारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांनी आज राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता. यामुळे नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला होता. त्यामुळे मुंबईतील भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. आज संध्याकाळी माथाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. मुख्यमंत्री आणि माथाडी नेत्यांच्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले.

माथाडी बोर्डात माथाडीच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात, माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये सल्लागार समितीची पुनर्रचना करावी, पुनर्रचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालावा, आदी माथाडी कामगारांच्या मागण्या आहेत.

दरम्यान, येत्या २७ फेब्रुवारी पर्यंत माथाडी कामगारांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनावर माथाडी कामगारांचा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी शिंदे-भाजप सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून याबाबत नेमकी काय पाऊले उचलली जातात, हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

‘माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात आज राज्यात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. हा संप पूर्णपणे यशस्वी झाला. या संपाची दखल घेत महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी व्यापारी बांधवांनी देखील या संपात सहभागी होऊन आपले सर्व व्यापार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. दरम्यान या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्वांनी या संपात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले होते. यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून निश्चितच शासनामार्फत सकारात्मक निर्णय घेतले जातील,’ असे ट्विट माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.