Friday, June 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'बाप' काढल्याने महापौर ट्रोल; 'त्या' शिवसैनिकाची हकालपट्टी

‘बाप’ काढल्याने महापौर ट्रोल; ‘त्या’ शिवसैनिकाची हकालपट्टी

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या एका ट्वीटमुळे चांगल्याच ट्रोल होत आहेत. एका ट्वीटर युझरचा बाप काढणे महापौरांच्या अंगाशी आले आहे. पण यासंदर्भात आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. बाप काढल्याचे ते ट्वीट एका शिवसैनिकाकडून चुकून टाकले गेले. पण हे चुकीचे ट्वीट टाकणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी केली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

नक्की काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

महापौर म्हणाल्या की, ‘काल बीकेसीमध्ये एक कार्यक्रम होता. माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि काही शिवसेनेचे कार्यकर्ते होते. कधी कोणताही कार्यक्रम असेल तर मी माझ्याकडे मोबाईल ठेवत नाही. माझा मोबाईला कधी लॉक नसतो. आजूबाजूला असलेल्या कोणाकडेही मी मोबाईल देते. त्याप्रमाणे मी एका शिवसैनिकाकडे मोबाईल दिला. बसल्या बसल्या त्याने ते चाळले असावे. दरम्यान आक्षेपार्ह ट्वीट असतात याबाबत काही शंका नाही. पण रागाने शिवसैनिकांने ट्वीट केल्यानंतर माझ्या हातात आल्यावर मी चेक केले. माझ्या लक्षात आले की, शिवसैनिकाने ही मोठी चूक केली आहे आणि असे करू नये. कोणी कितीही वाईट असले तरी आपण तसे वागू नये. या मताशी मी आहे आणि तुम्ही ऐरव्ही माझे वर्तन पाहिले आहे. मी कधीही असे गैरवर्तन करत नाही. मी त्वरित ते ट्वीट डिलीट केलं.’

मला या घटनेमुळे धडा मिळाला – महापौर

- Advertisement -

पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्याकी, ‘त्या शिवसैनिक मुलाला परत तू माझ्याकडे यायचे नाही आणि आता तू मला नको, असे सांगितले आहे. कारण आपण त्यांच्याकडे विश्वासाने मोबाईल देतो. पण याच्यातून मला धडा मिळाला की, व्यक्ती कितीही जवळचा असला तरी त्याच्याकडे आपला मोबाईल देता कामा नये.’

नक्की काय घडले होते?

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्वीटरवर अकाउंटवर शेअर केली होती. यामध्ये मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्यांच्या प्रतिसाद मिळाल्याची माहिती त्यांनी दिली होती. या ट्वीटरला एका युझरने कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचे कंत्राट दिले असा प्रश्न विचारला. यावर किशोरी पेडणेकर यांच्या अकाउंटवरून तुझ्या बापाला असे उत्तर दिले गेले. त्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या.

- Advertisement -

- Advertisement -