उद्योग क्षेत्रात महिलांचा टक्का वाढवणार

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात महिलांचा टक्का वाढविणे आणि त्यांच्यातील नवनिर्मितीला अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हेच आपले ध्येय आहे आणि हिच आपली प्राथमिकता राहील, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रज्ञा पोंक्षे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला समितीच्या अध्यक्षा म्हणून प्रज्ञा पोंक्षे यांना नियुक्तीचे पत्र देताना अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर.

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात महिलांचा टक्का वाढविणे आणि त्यांच्यातील नवनिर्मितीला अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हेच आपले ध्येय आहे आणि हिच आपली प्राथमिकता राहील, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रज्ञा पोंक्षे यांनी व्यक्त केले. चेंबरच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते प्रज्ञा पोंक्षे यांच्याकडे नव्या जबाबदारीची सूत्रे सोपाविण्यात आली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड अ‍ॅग्रीकल्चरलच्या कामांचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यात अनेक नवनवे उद्योजक हिरीरीने सहभागी होत असल्याचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि नेत्रदीपक काम करणार्‍या प्रज्ञा पोंक्षे यांच्यावर महिला समितीचे नेतृत्व सोपविण्यात आल्याचेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. आज उद्योगच नव्हे तर सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यामुळे इंटिरिअर डिझायनर म्हणून अल्पावधीतच आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणार्‍या प्रज्ञा यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले. प्रज्ञा पोंक्षे यांनी पर्यावरणाशी निगडित असलेली हार्मनी ही चळवळ उभारून समाजाला जागरूक करण्याचे मोठे कार्य केले आहे.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच प्रज्ञा पोंक्षे म्हणाल्या, अध्यक्षपदाच्या कार्यकाळात माझे एकच ध्येय असेल, ते म्हणजे उद्योग क्षेत्रात महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे. संधी मिळाली की महिला त्याचे सोने करून दाखवितात. महिलांच्या औद्योगिक समस्याही खूप आहेत, मला प्रामुख्याने त्याही सोडवायच्या आहेत. महिला उद्योग क्षेत्राशी निगडीत अनेक धोरणे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. एवढेच नव्हे तर मला महिलांना माहिती तंत्रज्ञानाची उपयुक्तता पटवून देत त्यांना ते यशस्वीपणे कसे हाताळायचे याचे तंत्रही शिकवायचे आहे. राज्यातील उद्योजक होऊ इच्छिणार्‍या व तसेच अन्य क्षेत्रातील कार्यक्षम महिलांना चेंबरच्या मंचावर आणून उद्योगक्षेत्रात महिलांचा टक्का आणि ताकद वाढविण्यासाठीही मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही पोंक्षे यांनी व्यक्त केला.