घरमुंबईतरुणांना नशामुक्त करण्यासाठी पालिकेचा पुढाकार

तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पालिकेचा पुढाकार

Subscribe

मादक द्रव्याच्या आहारी जाऊन नशापान करणाऱ्या व्यसनी तरुणांना नशामुक्त करण्यासाठी काँग्रेसचे अँटॉप हिल परिसरातील वार्ड क्रमांक १७९ चे नगरसेवक सुफीयान वणू यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. तसेच,
नशा मुक्तीचे काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स अनॉनिमस संस्था’ व मुंबई महापालिका प्रशासन यांच्या सहकार्याने नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सुफीयान वणू यांनी, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
मुंबईत सध्या मादक पदार्थांचे प्रकरण खूपच गाजत आहे. या मादक द्रव्यांच्या प्रकरणात सिने कलाकार अडकले आहेत. मादक पदार्थ सेवन केल्याने देशाचे भविष्य असलेले तरुण व्यसनी बनत चालले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाला भेडसावणारी ही मादक पदार्थांची नशेखोरीची समस्या कधी सुटणार असा सवाल पालक वर्गाला पडला आहे.

‘नार्कोटिक्स अनॉनिमस संस्था’

ही संस्था मादक पदार्थांच्या आहारी जाऊन नशेबाज झालेल्या तरुणांना व्यसन मुक्त करण्याचे काम करते. व्यसनी तरुणांना सखोल मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणे, त्यांना नशामुक्त करून त्यांचे पुनर्वसन करणे आदी कामे ही संस्था करते, असे काँग्रेसचे नगरसेवक सुफीयान वणू यांनी म्हटले आहे.
मुंबईतील तरुणांना नशामुक्त करण्याचा व त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा विडा नगरसेवक सुफीयान वणू यांनी उचलला आहे.

- Advertisement -

मात्र मुंबईसारख्या ठिकाणी नशामुक्त उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यासाठी जागेची कमतरता भासते. यास्तव, सुफीयान वणू यांनी, मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतीमधील एका वर्ग खोलीची मागणी पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना भेटून केली आहे. त्यांना या नशामुक्त अभियानाची संपूर्ण संकल्पना सांगण्यात आली आहे. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली असून सकारत्मकता दर्शवली असल्याचे वणू यांनी सांगितले.

पालिकेच्या शाळा सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बंद आहेत. तर काही शाळांमध्ये काही वर्ग खोल्या या रिकाम्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सकाळी व दुपारी दोन सत्रात शिक्षण देण्यात येते. त्यामुळे नशामुक्त अभियान हे पालिका शाळा सुटल्यावर म्हणजे सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत राबविण्याचा विचार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी पालिकेने अल्लाना महापालिका शाळा, अँटॉप हिल येथे तळमजल्यावर एक वर्ग खोली मोफत अथवा भाड्याने जरी उपल्बध केल्यास अतिशय चांगल्या प्रकारे हा नशामुक्तीचा उपक्रम अल्पावधीत म्हणजे लवकरच सुरू करण्यात येईल, असे वणू यांनी सांगितले.

- Advertisement -

पालिका नियमानुसार सहकार्य

पालिका शाळेतील वर्ग खोली भाडे तत्वावर देण्यासंदर्भात जी काही नियमावली व तरतूद आहे त्यात पात्र ठरणाऱ्यांचा विचार केला जातो. नगरसेवक सुफीयान वणू यांनी सदर उपक्रमाबाबत माहिती दिली असून तो उपक्रम चांगला आहे. आपण त्यांना शिक्षण खात्याचे संबंधित एओ मुख्तार शाह यांच्याशी बोलणे करून दिले आहे. कारण की, याबाबतचे कामकाज खालील स्तरावर पाहिले जाते. पालिका नियमावलीत कोणालाही मोफत व कायमस्वरूपी जागा देण्याची तरतूद नाही. मात्र त्यांनी आठवड्यातुन एक – दोन दिवस काही तास हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यक उपक्रमाला नकारघंटा न दर्शवता नियमावली पाहून सहकार्य करण्याचे सूचित केले आहे.

महेश पालकर, शिक्षण अधिकारी

(मुंबई महापालिका शिक्षण खाते)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -