घरCORONA UPDATEवैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या!

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या!

Subscribe

परीक्षांच्या नियोजनासाठी गठीत केलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने पदवी व पदव्युत्तर स्तरावर घेण्यात येणाऱ्या उन्हाळी सत्र २०२० या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नियोजनासाठी गठीत केलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच प्र. कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.

या समितीमध्ये विद्यापीठाच्या प्राधिकारणातील सर्व वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता, केंद्रीय परिषदेचे सदस्य डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. कैलास शर्मा आणि व्यवस्थापान परिषद सदस्य डॉ. एस. एस. सावरीकर उपस्थित होते. या समितीने शिफारस केल्यानुसार प्रशासनाने परीक्षांसंदर्भात निर्णय घेताना उन्हाळी सत्र २०२० च्या परीक्षा पुढील सुचना येईपर्यंत पुढे ढकलत असल्याचे म्हटले आहे. या परीक्षांचे वेळापत्रक राज्य सरकार, संस्थाप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून ठरविले जाणार आहे.

- Advertisement -

विद्यापीठाच्या या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी देण्याचेही आश्वासन या निर्णयात देण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठाच्या कुठल्याही निर्णयाची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -