दहिहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी संपन्न; हे आहेत ठळक मुद्दे

MNS's Dombivali Dahihandi canceled for flood victims
दहिहंडी

कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्यातील सर्व सणवार रद्द होत असतानाच आता दहिहंडी समन्वय समितीनेही यंदाच्या उत्सवाबाबत ठोस निर्यण घेतला आहे. आज दहिहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून त्यातून काही ठळक मुद्दे मांडण्यात आले आहे. त्यापूर्वीच माहिम, दादर, प्रभादेवी, जोगेश्वरी येथील मोठ्या दहिहंडी समितीने त्यांचा उत्सव या वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

१) २०२० हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे.

२) गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले अाहेच असे आढळून येईल. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृध्दांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो बाहेर काढलेला आहे हे ही तितकेच सर्वश्रुत सत्य आहे.

३) २०२० च्या या कोरोना संकटाने, या महामारीनेमात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.

कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे ? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे.?

४) या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करुन दहिहंडी समन्वय समितीने असा निर्णय घेतला आहे की यावर्षी “श्रीकृष्णजन्म” (अष्टमीची पुजा) हा अत्यंत साध्या पध्दतीने ( अर्थातच , सामाजिक अंतराचे भान ठेऊनच ) साजरा करायचा. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल.

मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुस-यादिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे दहिहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे.

वरील निर्णय हा यावर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

“सर सलामत तो पगडी पचास” किंवा बचेंगे तो औरभी लडेंगे /खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा सण/उत्सव पुढीलवर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो ही महामारी लवकरात लवकर दूर होवो हि दहिहंडी समन्वय समितीच्या वतीने श्रीकृष्ण परमात्म्याचरणी मनापासून प्रार्थना.