…तर ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग धोरण’ सापडणार अडचणीत ?

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्यामुळे मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेल या इंधनामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय समोर आला आहे.

मुंबईत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांत लागणाऱ्या आगी व वीज भारनियमन पाहता मुंबई महापालिका तयार करीत असलेले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग धोरण अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या पाठिंब्यामुळे मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेल या इंधनामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय समोर आला आहे. त्यावर मुंबईत व राज्यातही अंमलबजावणी सुरू आहे. मुंबई महापालिका व बेस्ट यांनी बेस्टच्या बस ताफ्यात भाडे तत्त्वावरील खासगी बसगाड्या कंत्राटदाराकडून घेतल्या असून त्या सध्या रस्त्यावर धावत असून त्यास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात आतापर्यंत दाखल ३८६ इलेक्ट्रिक बसगाड्या सध्या रस्त्यावर धावत आहेत. बेस्टच्या परिवहन विभागात आगामी काळात १० हजार इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका या बसगाड्या चालविताना त्यांना चार्ज करण्यासाठी काही ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट सुरू करीत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी ‘इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग’ धोरण बनविण्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांची पहिली बैठक गुरुवारी पालिका मुख्यालयात पार पडली. त्यामुळे लवकरच इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग’ धोरण तयार करण्यात येईलव त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाईल.

मात्र सध्या मुंबईसह राज्यात वीज भारनियमन सुरू असल्याने अखंडित वीज पुरवठा होत नाही. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनात विशेषतः दुचाकीला आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर सरकारने तुर्तास बंदी घातली आहे. त्यामुळे जोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांसाठी अखंडित वीज पुरवठा व मागणी तसा इलेक्ट्रिक व्हेईकलचा पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत पालिकेचे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग धोरण अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर राज्य शासन व महापालिका यांना काहीतरी ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.