घरमुंबईशिक्षणाच्या मार्गाला टपर्‍यांचा विळखा,पोलीस पालिकेचे दुर्लक्ष; शाळा हतबल

शिक्षणाच्या मार्गाला टपर्‍यांचा विळखा,पोलीस पालिकेचे दुर्लक्ष; शाळा हतबल

Subscribe

लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ टक्केच विद्यार्थी व्यसन सोडू शकतात. मात्र १८ वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन केले नाही तर ९० टक्के लोक तंबाखूच्या व्यसनाला बळी पडणार नाहीत. तंबाखू हे मृत्यूचे सर्वात जास्त कारण आहे. भारतात, दरवर्षी तोंडाचा कर्करोग होताना जवळपास १ लाख नवीन प्रकरणे आमच्या समोर येत असतात. ज्यापैकी ५० टक्के मृत्यू १२ महिन्यांत होत असल्याने आम्ही खूप चिंतेत आहोत. - डॉ. पंकज चतुर्वेदी, प्राध्यापक व कर्करोग तज्ज्ञ, टाटा मेमोरियल हॉस्पिटल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा किंवा महाविद्यालयापासूनच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई असतानाही मुंबईतील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात हा नियम धाब्यावर बसवण्यात आलेला दिसून येत आहे. परिणामी मुंबईतील नवीन पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यावर गुटख्याचे पाऊच तोंडात रिकामे करत, सिगारेटच्या धुरात हरवून जाणारी मुले अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत. पानटपर्‍यांवर कारवाईसंदर्भात शाळा आणि महाविद्यालयाकडून वारंवार पालिका तसेच पोलिसांना कळवण्यात येते. परंतु पालिका आणि पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भावी पिढी घडवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये जरी अथक प्रयत्न करत असले तरी प्रशासनच भावी पिढीबाबत सजग नसल्याचे दिसून येते.

अहवाल सर्वेक्षणाचा…

- Advertisement -

तंबाखूमुळे होणारे तरुणांचे मृत्यू हे एक टाळता येण्याजोगे आहेत. भारतामध्ये दररोज 2500 नागरिकांचा तंबाखू संबंधित आजारामुळे मृत्यू होतो. तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे जागतिक आरोग्य संघटेनेने याला जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी लोक तंबाखूचा वापर करण्यात येतो. जगामध्ये प्रत्येक वर्षी 50 लक्ष आणि भारतात अंदाजे 10 लक्ष लोक तंबाखूमुळे होणार्‍या आजारांनी मृत्यूमुखी पडतात. हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचे आजार तसेच अन्य असंसर्गजन्य रोगांचे कारण तंबाखूचा वापर आहे. ग्लोबल यूथ तंबाखू सर्व्हेनुसार भारतात 13 ते 15 वर्षे वयोगटातील 14 टक्के पेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात तंबाखूची सवय लागल्याने ही सवय सोडणे कठीण जाते आणि यामुळे विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो.

भारतात दरवर्षी 5500 विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरुवात करतात. तंबाखू उत्पादक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाते. भारतात आठ वर्षे वयापासून मुलांमध्ये तंबाखू सेवनाची सुरुवात होते. विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जाण्यापासून वाचवणे ही समाज, पालक, शिक्षक आणि शासन यांची एकत्रित जबाबदारी आहे. तरुण मुलांचे संरक्षण समाजाला करता येत नसेल तर त्या समाजाला प्रगत समाज म्हणात येणार नाही. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या टक्केवारीत २०१० च्या तुलनेत २.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे चिंतेचे कारण असून त्याचा मोठा परिणाम राज्यातील सार्वजनिक आरोग्यावर होत आहे. तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. तंबाखूसेवन सुरू करण्याचे सरासरी वयही महाराष्ट्रात १८.५ वर्षांवरून १७.४ वर्षांवर आले आहे.

- Advertisement -

कायदा काय सांगतो?

तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तयार केला आहे. शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनांच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या तंबाखू नियंत्रण कायदा 2003 च्या कलम 6 नुसार शैक्षणिक संस्थांपासून 100 यार्डच्या आतमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करण्यास बंदी करणे आणि शाळेमध्ये तंबाखूमुक्त वातावरण ठेवणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणे बंधनकारक आहे. कलम 6 (अ) नुसार तंबाखूविक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकहून करून घेण्यास बंदी आहे. या नियमांचे पालन न केल्यास 200 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

तंबाखू  बंदीसाठी   शाळांनी करावयाची  कार्यवाही

1. शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत आणि प्रत्येक मजल्यावर, जिन्यासह तसेच प्रत्येक मजल्यावरील लिफ्टच्या प्रवेशद्वारावर फलक लावलेले असणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेने त्यांच्या स्तरावर यासाठी समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करावी.

2. शाळेच्या प्रवेशद्वारावर 100 यार्ड परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंदीबाबतचे फलक लावणे

3. यासंदर्भातील लवकरात लवकर कार्यवाही करून त्याबाबत अहवाल शालेय शिक्षण विभागाच्या माहिती पोर्टलवर भरावा. त्याबाबत सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जाईल. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो आणि शाळेला कारवाईस सामोरे जावे लागू शकते

4. शाळेच्या आवारात किंवा वर्गात शिक्षक आणि कर्मचारीवर्ग तंबाखू किंवा तंबाखूमुक्त पान, गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. विद्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारीवर्ग यांनी शाळांच्या आवारात तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये.

5. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डीपीवायए (दादर पारसी युथ असोसिएशन), वडाळा

वडाळ्यातील डी. पी. वाय. ए. (दादर पारसी युथ असोसिएशन) शाळेपासून 50 मीटर अंतरावर पानटपरी आहे. पानटपरीमध्ये सर्व प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. केजीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण घेणारी मुले या शाळेत शिकतात. शाळेलगत ही टपरी असल्यामुळे मधल्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांना सिगारेट, तंबाखू आणि इतर गुटख्याचे पदार्थ सहज मिळतात. त्यामुळे हे विद्यार्थी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. शाळेत शिकायला येणार्‍या मुलांच्या अभ्यास आणि इतर गोष्टींवर परिणाम होऊ नये यासाठी शाळा आणि महाविद्यालय परिसरातून 150 मीटर परिसरात असे पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे पण चोरून हे पदार्थ विकले जातात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नायगाव एज्युकेशन सोसायटी, भोईवाडा

भोईवडा परिसरातील नायगाव एज्युकेशन सोसायटी शाळेसमोर रस्त्यालगत अगदी 100 मीटरच्या अंतरावर तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत माध्यमिक विद्यार्थ्यांपासून उच्च माध्यमिक वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. हे पदार्थ अगदी सहजपणे विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ साहित्य विकणार्‍या पानटपर्‍या सिगारेट आणि इतर गुटख्याचे पदार्थ विकत असतात. मुंबई उपनगराबरोबरच कितीतरी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात हीच परिस्थिती आहे.

माटुंग्यात नियम धाब्यावर

माटुंगा परिसरात शाळा, महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. माटुंगा पूर्वेला राजा शिवाजी विद्यालय, रामनारायण रुईया महाविद्यालय, वेलिंगकर इन्स्टिटयूट तसेच पालिकेचे शिक्षण विभागाचे मुख्य कार्यालय एकाच परिसरात आहे. मात्र या परिरसात मोठ्या प्रमाणात पानटपर्‍या थाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यार्ंना सहज तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होतात. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. विशेष म्हणजे पालिकेच्या शिक्षण विभागाचे मुख्य कार्यालयही या परिसरात असूनही या पानटपर्‍यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्याचप्रमाणे खालसा महाविद्यालयाशेजारीच बार आणि क्लासिक हॉटेलच्या बाहेरील टपरीवर अनेक तरुण सिगारेट ओढताना दिसतात.

महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ

परळमधील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी पहिली पसंती असलेल्या महर्षी दयानंद महाविद्यालयालाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या पानटपरीवर सिगारेट, सुगंधी सुपार्‍यांची सर्रास विक्री सुरू आहे. परळमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा आहेत. यातील बहुतेक शाळांबाहेर पानटपरी सुरु आहेत. राज्यासह मुंबईत गुटख्यावर बंदी असतानाही त्याची विक्री छुप्या पद्धतीने होते. शहरात १८ वर्षाखालील व्यक्तींना गुटखा आणि तंबाखू तसेच सिगारेट विकायला बंदी आहे. तशी पाटी अनेक टपरीवाले लावतात. मात्र ती फक्त नावापुरती असते. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने तंबाखू, गुटखा, पाकिटे प्लॅस्टिकच्या पिशवीतून विकली जातात. अनेक शाळा महाविद्यालयांच्या जवळच्या रस्त्यांवर सिगारेटचे तुकडे, गुटखा, तंबाखूच्या पडलेल्या पिचकार्‍या पाहून नवी पिढी नशेच्या आहारी कशी जात आहे हे लक्षात येते.

मुंबई विद्यापीठ, कलिना

मुंबई विद्यापीठाच्या गेटबाहेरील अतिक्रमण मुंबई महापालिकेने हटवली आहेत. त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकणारे पानटपरीचे गाळेही जमीनदोस्त करण्यात आले आहेत. पण रात्रीच्या वेळेत विद्यापीठ परिसरातील रस्त्यावर मात्र तंबाखूजन्य पदार्थ विकणारे सायकलस्वार विक्रेते हमखास पहायला मिळतात. बेकायदा चहाची टपरी आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणारे सायकलस्वार या ठिकाणी मोठी ग्राहकांची गर्दी जमवतात. मुंबई विद्यापीठाच्या गेटबाहेर मात्र तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध आणणारी कोणताही फलक किंवा पाटी लावण्यात आली नाही.

पालकांची जबाबदारी काय ?

आपला पाल्य शाळेतून घरी आला की त्याच्याशी किमान अर्धा तास बसून शांतपणे चर्चा करावी. शिवाय, जबाबदारीची जाणीव ठेवत व्यसन या विषयावर चर्चा केली पाहिजे. काय चूक, काय बरोबर यावर संवाद साधला पाहिजे. म्हणजे मुलांच्या विचार प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. तसेच त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत ? याविषयी माहिती घेतली पाहिजे.

आक्रमक कारवाई गरजेची

मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय जाहीर केलेला आहे. आम्ही शाळांशी नेहमीच चर्चा करत असतो. सध्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. ते कमी करायचे असतील तर शाळांच्या परिसरातील पानटपर्‍यांवर कारवाई गरजेची आहे. आम्ही पालक संघटना म्हणून पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. ही तक्रार फक्त कागदावरच राहते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. म्हणून हे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी आक्रमक कारवाई केल्यास परिस्थिती बदलेल, अशी माहिती पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती चव्हाण यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहेत, हे खरंच खूप धक्कादायक आहेत. आमच्याकडे येणार्‍या तक्रारींचे प्रमाण वाढत आहेत हे सत्य मान्य करावे लागेल. आज तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून व्यसनाचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. त्यामुळे शाळांसमोर मोठे आव्हान असून आम्ही मुख्याधयापक म्हणून अनेक प्रयत्न करीत असतो. दुकानदारांवर कारवाई करणे आमच्या हातात नाही. त्यामुळे त्यासाठी पालिका किंवा पोलिसांनी पुढे येणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या दृष्टीकोनातून नेहमीच तंबाखूमुक्त शाळा होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. युट्यूबचा उपयोग करून चित्रफीतदेखील विद्यार्थ्यांना दाखवितो. त्या माध्यमातून जनजागृती होत असून त्याचा फायदा नक्कीच होईल.
– सुदाम कुंभार, मुख्याध्यापक, शैलेंद्र हायस्कूल, बोरिवली.

सौरभ शर्मा, विनायक डिगे, किरण कारंडे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, भाग्यश्री भुवड.

फोटो : प्रवीण काजरोळकर, संदीप टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -