म्हाडाची मुंबईची सोडत दिवाळीनंतर ?

Mhada
म्हाडा

मुंबई मंडळाची एक हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घरांच्या किमती कमी करत तीन आकडी मॅजिक फिगर गाठण्यासाठी सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळात जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीच्या आधी घरांची सोडत जाहीर करून मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे खरा, पण लाल फितीच्या कारभारात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची घोषण अडकते की काय अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत दहा दिवसांमध्ये मुंबई मंडळाच्या लॉटरीची तारीख जाहीर करणार असे स्पष्ट केले होते. परंतु , मुंबई मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर अद्यापही स्वाक्षर्‍या झाल्या नसल्याचे कळते. त्यामुळेच मुंबई मंडळाच्या लॉटरीची घोषणा रखडली असल्याची माहिती आहे. दिवाळीपूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता त्यामुळे धुसर झाल्याचे बोलले जात आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत म्हाडा मुंबईसाठी ११९४ घरांची लॉटरी जाहीर करून दिवाळी गिफ्ट देईल असे बोलले जात होते. पण हे दिवाळी गिफ्ट आता दिवाळीनंतर मिळेल की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान, म्हाडाच्या घरांसाठी दर कमी करत जाहिरात काढण्यासाठी मात्र म्हाडा प्रशासनामार्फत मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते.

म्हाडाच्या बैठकीत झालेल्या धोरणात्मक निर्णयानुसार मुंबईकरांसाठी घरांच्या किमती कमी करणे हा अजेंडा यंदा ठेवण्यात आला होता. लोअर परळ आणि विक्रोळीच्या घरांच्या किमती कमी करणे बैठकीतील अजेंड्याचाच भाग असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले होते. म्हाडाने तयार केलेल्या घरांची वेगळी लॉटरी तसेच डेव्हलपरने तयार केलेल्या प्रिमिअम घरांची लॉटरी अशी वेगवेगळी लॉटरी काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला होता.

म्हाडाच्या घरामध्ये विविध आर्थिक स्तरांमध्ये रेडिरेकनरमध्ये कपात केल्यानेही डेव्हलपरने तयार केलेल्या प्रिमिअम घरांच्या किमतीत घट होणार आहे. मध्यम उत्पन्न गटामध्ये ७० टक्के रेडिरेकनर दराने घराच्या किमती ठरविण्यात येणार आहेत. त्यामुळेच लोअर परळच्या घराची किंमत १ कोटी ४४ लाखांवरून ९० लाख इतकी होईल. अल्प उत्पन्न गट ५० टक्के रेडिरेकनर दराने तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३० टक्के दराने रेडिरेकनर दराने घरांच्या किमतीचे दर ठरविण्यात येतील. टागोर नगर येथील आम्रपाली इमारतीमधील घर १ कोटी १७ लाखांवरून आता ८२ लाख रूपयांना उपलब्ध होणार आहे.

म्हाडा २०१८ सोडत घरांची संख्या
अँटॉप हिल वडाळा २७८
प्रतिक्षा नगर ८३
प्रतिक्षा नगर ५
पीएमजीपी मानखुर्द ११४
गव्हानपाडा मुलुंड २६९
पंतनगर २
टागोर नगर आम्रपाली ७
पंतनगर ओबी १ (2 घरे)
सहकार नगर ८
सिद्धार्थ नगर गोरेगाव २४
महावीर नगर १७०
बदानी बोरी चाळ ६८
विखुरलेले गाळे २८
तुंगा पवई (२०१३) ६५
तुंगा पवई (२०१४) २
तुंगा पवई (२०१६) २६
मानखुर्द बिल्डिंग नं. १ (1 घर)
मानखुर्द बिल्डिंग ३ (१ घर)
मानखुर्द २०१७ (2 घर)
चांदिवली २०१७ (1घर)
गायकवाड मालवणी मालाड (२०१५) १
ओ बी ८ सिद्धार्थ नगर गोरेगाव १
लोअर परेल २७
शिंपोली कांदिवली २०११ (4 घरे)
शैलेंद्र नगर दहिसर १
शिंपोली २०१६ (1)
मागाठाणे २०१३ (1)
गोराई (1)
मागाठाणे २०१६ (1)