विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा; मिलिंद देवरांच्या सूचना

मुंबई प्रदेश काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी तयारीचा श्रीगणेशा केला

milind devra
मिलिंद देवरा

मुंबईत लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी तयारीचा श्रीगणेशा केला असून मुंबईतील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची आढावा बैठक देवरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देवरा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा घेतला असून कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक देखील केले. तर आगामी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मुंबईतील सर्व नेते मंडळी आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद देवरा यांनी सर्व पदाधिकार्‍यांना आगामी विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन देखील केले. यावेळी कार्यकर्तांना संबोधित करताना मिलिंद देवरा म्हणाले की, राज्यातून भाजप आणि शिवसेना सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी मुंबई काँग्रेसला निर्णायक भूमिका बजावयाची असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

पुन्हा मुंबईच्या विकासाचा वेग वाढवायचा

यावेळी मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून गेल्या पाच वर्षांपासून युतीच्या सरकारने आपल्या मुंबईचा विकास थांबविला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाचा वेग वाढवायचा आहे. यासाठी आपण अर्थतज्ज्ञ आणि इतर जाणाकार मंडळीची मदत घेणार असून त्यांच्या मार्गदर्शनातून विविध योजना बनविणार आहोत. जेणेकरुन मुंबईचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवून द्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.