मिलिंद नार्वेकर पोहोचले अधिवेशनाच्या संयुक्त सभागृहात; चूक लक्षात येताच दिले स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना थेट अधिवेशनाच्या सभागृहात जाऊन बसले. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देताच ते तिथून बाहेर पडले.

Milind Narvekar of the Thackeray group reached the budget session hall

शिवसेना (शिंदे गट)-भाजप सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज (ता. २७ फेब्रुवारी)पासून सुरुवात झाली आहे. पुढील महिनाभर हे अधिवेशन सुरु राहणार आहे. आजच्या अधिवेशनाला राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. पण यानंतर घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे अधिवेशन सुरु असताना थेट संयुक्त सभागृहात जाऊन बसले. पण त्यांची ही चूक आदित्य ठाकरे यांनी लक्षात आणून दिल्याने नार्वेकर हे लागलीच सभागृहाच्या बाहेर पडले. पण यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

मिलिंद नार्वेकर हे सभागृहात जाऊन बसल्यानंतर त्यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रेक्षक गॅलरी सदमजून मी चुकून सभागृहात जाऊन बसलो, असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे. परंतु सुरक्षारक्षकांनी कसे काय कोणतीही तपासणी न करता नार्वेकर यांना सभागृहाच्या आत सोडले? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, नार्वेकर प्रक्षेगृहात बसण्याऐवजी सभागृहात बसले यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होओ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नार्वेकरांना बऱ्याच दिवसांपासून आमदार होण्याची इच्छा आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी ती पूर्ण केलेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना व्यक्त केली. आमदार शिरसाट म्हणाले, नार्वेकरांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. ते काहीही करु शकतात असे त्यांचे राजकीय संबंध आहेत. त्यामुळे ते सभागृहात बसले असतील तर त्यांची आमदार होण्याची इच्छा लवकर पूर्ण होओ, अशा आमच्या शुभेच्छा आहेत.

हेही वाचा – राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादाची नांदी; रोहित पवार म्हणतात….

मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी गेले होते. त्यानंतर या दोघांमधील मैत्री उघड झाली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नार्वेकरांची जवळीक वाढल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात नार्वेकरांची जोरदार चर्चा सुरु आहे.