घरमुंबईएफडीएच्या रडारवर झोपडपट्ट्यांमधील दूधभेसळ; मुंबईमध्येच भेसळखोरांचे अड्डे

एफडीएच्या रडारवर झोपडपट्ट्यांमधील दूधभेसळ; मुंबईमध्येच भेसळखोरांचे अड्डे

Subscribe

झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या दूधभेसळीला रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. काही दिवसांपासून भेसळयुक्त तेल व तेलजन्य पदार्थ विकणार्‍यांवर एफडीएकडून कारवाई करण्यात येत होती. त्यानंतर आता एफडीएने दूधभेसळ करणार्‍यांवर आपली करडी नजर रोखली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या दूधभेसळीला रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रारी एफडीएकडे येत आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी एफडीएने तेल व तेलजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानदारांविरोधात धाडसत्र सुरू केले होते. डिसेंबरमध्ये मुंबईच्या विविध भागांमधून जवळपास ५० लाखांचा भेसळयुक्त तेलसाठा जप्त केल्यानंतर एफडीएने आपली नजर दूधभेसळ करणार्‍यांकडे वळवली आहे. परराज्य व जिल्ह्यातून येणार्‍या दुधावर २१ व २२ जानेवारीला एफडीएकडून कारवाई करण्यात आली. मुंबईच्या सीमेवर पाच ठिकाणी ही कारवाई करत तब्बल २५४ नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये ९७ टक्के दूध हे दर्जेदार असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दुधातील भेसळ ही मुंबईमध्येच होत असल्याचे स्पष्ट झाल्याने आता एफडीएच्या रडारवर झोपडपट्यांमधील दूधभेसळ करणारे आले आहेत. दूध भेसळीचे प्रकार पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी अनेकदा उघडकीस आणले आहेत. मुंबई शहर व उपनगरात दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राजसरोपणे पहाटे ३ ते ५ च्या सुमारास दुधाची भेसळ होते. दुधात पाणी मिसळणे, नामाकित कंपन्यांच्या दुधांच्या पिशव्या वापरून त्यामध्ये भेसळयुक्त दूध भरणे, चुकीच्या पद्धतीने पिशवी पॅक बंद करणे असे अनेक प्रकार झोपडपट्ट्यांमध्ये सर्रास सुरू असतात. त्या अनुषंगाने शहरातील झोपडपट्ट्यांची माहिती घेणे व यापूर्वी भेसळ झालेल्या ठिकाणांवर पोलिसांच्या मदतीने एफडीएकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

अ‍ॅन्टॉप हिल झोपडपट्टीत भेसळयुक्त दूध जप्त

मागील आठवड्यात एफडीएच्या अधिकार्‍यांनी मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल झोपडपट्टी परिसरात धाड टाकून भेसळयुक्त दूध जप्त केले होते. यातील दुधाचे काही नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले असून, ४ नमुने दूषित आढळून आल्याचे अन्न व औषध प्रशासन (अन्न) सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सागिंतले. या पार्श्वभूमीवरच मुंबईतील अन्य झोपडपट्ट्यांमध्येही धाडसत्र सुरू केले जाणार असल्याची माहिती केकरे यांनी दिली.

कशी राबवणार मोहीम

झोपडपट्टी भागामध्ये कारवाई करण्यात एफडीएला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एफडीएने त्यांच्या अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या भागावर बारीक नजर ठेवण्यास सांगितली आहे. झोपडपट्टीमध्ये गुप्त माहितीदार नेमून त्यांच्या माध्यमातून माहिती मिळवणे, पोलिसांशी सातत्याने संपर्कात राहून झोपडपट्ट्यांमध्ये कारवाई करण्यात येणार आहेत.

डिसेंबरमध्ये केलेली कारवाई

  • भायखळा येथे ३४ लाखांचे मद्य जप्त
  • दारूखाना येथे साडेतीन लाखाचे तेल जप्त
  • डोंगरीतून ५ लाखांचा तेलसाठा जप्त
  • घाटकोपरमधून १ लाख ८२ हजारांचा तेलसाठा जप्त
  • दहिसरमधून ३ लाख ६६ हजारांचा तेलसाठा जप्त
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -