आता गुजरात पुरवणार मुंबईला दूध

प्रवासी ट्रेनमधून होणार दुधाची वाहतूक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वेने दिली परवानगी.

Milk transport
प्रातिनिधिक फोटो

राज्यभरात सुरू असणाऱ्या दूध आंदोलनाचा फटका मुंबईला बसू नये, यासाठी पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला आहे. आता पॅसेंजर ट्रेनमधून मुंबईला दूध पुरवठा करण्यात येणार आहे. याबद्दल ट्विटरवरुन रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. हे दूध गुजरात राज्यातून थेट मुंबईला पुरवले जाणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक ५९४४० (अहमदाबाद-मुंबई सेंट्रल) या पॅसेंजर ट्रेनमधून पुढच्या काही दिवसांसाठी दूध वाहून नेण्याची परवानगी दिली आहे. मुंबईत कुठे दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

पॅसेंजर ट्रेनमधून दुधाचा पुरवठा
अहमदाबाद-मुंबई सेंट्रल प्रवासी ट्रेनमधून पुढचे काही दिवस दूधाची वाहतूक केली जाणार आहे. ट्रेनमधून ४४ हजार लीटर क्षमतेचे प्रत्येकी १२ मिल्क कंटेनर नेण्याची पश्चिम रेल्वेने परवानगी दिली आहे. मंगळवारी पुण्यात हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला होता. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसंच अमरावती अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी टँकर अडवले होते. तरीही, मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. तो तसाच कायम राहावा यासाठी पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुजरात राज्यातून येणार दूध
महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान गुजरात येथून दूध पूरवले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली असून काही तासात गुजरात येथून दूध मुंबईला पोहचवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुंबईला फटका लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.