सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अभियान राज्यभरात राबवावे – आदित्य ठाकरे

विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चिंतपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

Aditya Thackeray meet union leaders in delhi during visit to Delhi before Ayodhya
'पुन्हा चला नाहीतर पुढे चला' हाच आपला मंत्र, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अभियान राज्यभरात राबवावे, असे निर्देश पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत बुधवारी सह्यादी अतिथीगृह येथे करण्यात आला. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष संध्या दोशी, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार ,सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी तसेच शिक्षण खात्यातील इतर अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागत आहे. हे आज दिसणारे चित्र मागील १० वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण अर्थात राईट टू क्वॉलिटी एज्युकेशन हे ध्येय नजरेसमोर ठेवून त्यासाठी जाणीवपूर्वक चांगले बदल घडविण्यात आले. त्याही पुढे जाऊन आता सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चिंतपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात. शाळेमध्ये येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज अर्थात दंत, मानसिक आणि मधुमेह या ३ आरोग्य पैलूंच्या दृष्टीकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोविड कालावधीमध्ये राज्यभरात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १६ टक्के नागरिकांना रक्तशर्करा संबंधित आरोग्य समस्या असल्याची बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे दंतविकारामुळे बालकांमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण होते. एवढेच नव्हे तर, मानसिक आरोग्य ठिक नसल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो. हे लक्षात घेता, या तिनही आरोग्य मुद्यांवर विद्यार्थ्यांची काळजी देखील महापालिकेच्या शाळांमधून घेतली जात आहे, त्यासाठीच सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राबवित असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शाळांमधून योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांचं उज्ज्वल भविष्य घडतं. महापालिका प्रशासन सुरक्षित शाळेसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर निधी खर्च करत असल्याची बाब कौतुकास्पद आहे.  सुरक्षित शाळा प्रवेश’ हा आगळावेगळा उपक्रम नगरविकास खात्याच्या माध्यमातून राज्यभर नेण्यात येईल, त्यासाठी स्पर्धा, विशेष प्रोत्साहन असे प्रयत्न केले जातील. तर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मी स्वतः मुंबई महापालिकेच्या शाळेची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले. पालिका शाळांबद्दल मला अधिक स्नेह आहे. या शाळांमधून फक्त विद्यार्थी नव्हे तर, समाजाला आणि देशाला पुढे नेणारा सुजाण नागरिक घडवावयाचा आहे. ही बाब लक्षात घेऊनच शिक्षण विभागात होत असलेले चांगले बदल स्वागतार्ह आहेत. महापालिकेच्या शाळा या सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नावाजल्या पाहिजेत, अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. मागील २ वर्षांचा कोविड कालावधी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत कठीण ठरला. शैक्षणिक विकासाला पुन्हा गती देताना ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ यासारखे उपक्रम महत्त्वाचा हातभार लावणारे ठरतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी, ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम म्हणजे विकास आणि शिक्षण यांचे एकत्रित असे टोटल पॅकेज आहे, अशा शब्दात उपक्रमाचे कौतुक केले.