घरमुंबईडागडुजीमुळे मंत्री मंत्रालयात फिरकेनात, फक्त कॅबिनेटला हजेरी!

डागडुजीमुळे मंत्री मंत्रालयात फिरकेनात, फक्त कॅबिनेटला हजेरी!

Subscribe

खातेवाटप झाल्यानंतर देखील अद्याप अनेक मंत्र्यांनी मंत्रालयात आपल्या दालनातून कामकाज सुरू केलेलं नाही. या दालनांची अद्याप डागडुजी सुरू असल्यामुळे खुद्द आदित्य ठाकरे देखील अद्याप आपल्या दालनात गेलेले नाहीत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असला, तरी देखील मंत्रालयात अजूनही मंत्र्यांची संख्या फारच कमी दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर २ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना दालनाचे वाटप देखील झाले. मात्र, अजूनही अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांच्या दालनाचे डागडुजीचे काम सुरू असल्याचे मंत्रालयात पहायला मिळत आहे. यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या देखील दालनाचा समावेश आहे. मंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या मंत्रालयातील दालनात त्यांना सातव्या मजल्यावरील ७१७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. मात्र अजूनही या दालनाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने आदित्य ठाकरे या दालनामध्ये कधी बसणार? अशी उत्सुकता लागली आहे. विशेष बाब म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या तब्बल सात मंत्र्यांच्या दालनाचे काम अजूनही सुरू आहे.

या मंत्र्यांच्या दालनाचे काम अजूनही सुरूच!

महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांनी आपल्या दालनाची डागडुजी करून दालनात बसायला देखील सुरुवात केली. मात्र संजय राठोड, के. सी. पाडवी, दिलीप वळसे-पाटील, दादा भुसे, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, उदय सामंत, जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांच्या दालनाचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री एकतर त्यांना मिळालेल्या बंगल्यातून कामकाज पाहतात किंवा फक्त कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात येतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीचे मंत्री आपली दालने आणि बंगले चकाचक करत असताना याच्या नुतनीकरणासाठी लागणारी रक्कम वाढू शकते अशी माहिती मिळत आहे. विशेष बाब म्हणजे मंत्र्यांच्या प्रत्येक कार्यालयाच्या नूतनीकरणाचा खर्च हा जवळपास १८ ते १९ लाख इतका असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -