ठाण्यात 20 ते 22 डिसेंबरला मिसळ महोत्सव

सलग तिसर्‍या वर्षी अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीने 20 ते 22 डिसेंबर दरम्यान सकाळी 8 ते रात्रो 10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथे ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच छताखाली महाराष्ट्रातील विविध प्रांतातील मिसळची चव चाखण्याचा आनंद ठाणेकरांना मिसळ महोत्सवातून मिळणार असून मिसळ महोत्सवात प्रवेश विनामूल्य असणार आहे. विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन असलेल्या या ऊर्जा महोत्सवाला ठाणेकरांनी आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन आयोजिका नगरसेविका मृणाल अरविंद पेंडसे यांनी केले आहे.

ऊर्जा महोत्सवाच्या माध्यमातून महिला उद्योजक, बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, अबालवृध्दांना एक मनोरंजनाचे ठिकाण मिळावे, एकाच छत्राखाली खरेदी आणि मनोरंजनाचा आनंद घेता यावा या उद्देशाने ऊर्जा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. ऊर्जा महोत्सवात प्रवेश विनामूल्य असणार आहे. या महोत्सवांतर्गत मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मिसळ महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मिसळची चव खवय्यांना चाखता येणार आहे. विविध गृहोपयोगी वस्तुंनी नटलेली भव्य ग्राहक पेठ ठाणेकरांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. यामध्ये कलात्मक वस्तू, क्राफ्ट, इमिटेशन ज्वेलरी, रेडिमेड डिझायनर ड्रेस आणि ड्रेस मटेरीयल तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा या ग्राहक पेठेत समावेश असणार आहे. ऊर्जा महोत्सवाच्या ठिकाणी तरुणाईसाठी विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. तर बाळगोपाळांसाठी विशेष असा किड्स झोनही उभारण्यात आला आहे. थ्रीडी पोर्टेट आणि कार्टुनच्या रांगोळीचा अविष्कार हे ऊर्जा महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.