मुंबई : म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भक्ती अक्षय कांडरकर या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भक्तीने तक्रारदार महिलेसह तिच्या दोन नातेवाईकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
भक्ती कांडरकर तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. तक्रारदार वयोवृद्ध महिला ही दादर परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिची भक्तीसोबत ओळख झाली. या ओळखीत तिने ती म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर काम करत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. म्हाडामध्ये कामाला असल्याने तिचे काही अधिकार्यांशी चांगले संबंध आहे. त्यांच्या मदतीने त्यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते.
गोरेगाव येथील उन्नतनगरात लवकरच म्हाडाची सोडत निघणार असून तिथेच तिला टू बीएचके फ्लॅट वीस लाखात देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने तिला फ्लॅटसाठी वीस लाख रुपये दिले. तिच्यासह तिची बहीण आणि वहिनीनेही तिला अनुक्रमे साठ आणि वीस लाख रुपये दिले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही तिने फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटसाठी दिलेले पेसेही परत केले नाही. वारंवार विचारणा करूनही तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर तिने फ्लॅट तसेच फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत करणार नाही असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रंजना वराडकर हिने दादर पोलीस ठाण्यात भक्ती कांडरकर हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar